Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि कपूर कुटुंबीयाना ख्रिसमसचा महागात पडणार असल्याची शक्यता आहे. रणबीर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांविरोधात मुंबईतील (Mumbai) घाटकोपर पोलीस ठाण्यात (Ghatkopar Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. सनातन धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाताळनिमित्ताने कपूर कुटुंबीयांकडून केक कापला जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आज पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


कोणत्या कलमातंर्गत तक्रार दाखल?


सनातन धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रणबीर कपूर आणि इतर कपूर कुटुंबाविरुद्ध घाटकोपर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 295, 509, (34) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय दीनानाथ तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत ही तक्रार केली आहे. अन्य कोणताही विशेष सण साजरा करताना केकवर मद्य ओतून त्याला आग लावली आणि  हिंदू देवी-देवतांचे जाणीवपूर्वक आवाहन केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 


 






तक्रारीत काय म्हटले?


रणबीर कपूरने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलेही उपस्थित होती. या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केकवर मद्य ओतली गेली आणि त्याला आग लावण्यात आली. त्यानंतर रणबीर कपूर जय माता दी असे म्हणतो. रणबीरने जय माता दी म्हणताच घरातील बाकीचे सदस्यही जय माता दी म्हणतात. हिंदू धर्मात वर्ज्य असलेला पदार्थ जाणूनबुजून वापरल्यानंतर या सर्वांनी अग्नी प्रज्वलित करण्याबरोबरच हिंदू देव-देवतांनाही आवाहन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 


हिंदू धर्मात कोणत्याही देवी-देवतांचे आवाहन करण्यापूर्वी अग्नीदेवतेचे आवाहन निश्चितपणे केले जाते. ही माहिती रणबीर कपूर आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना नक्कीच माहीत होती. असे असूनही, रणबीर कपूरने जाणूनबुजून मद्य पदार्थांचा वापर करत देव-देवतांना आवाहन केले आहे आणि इतर कोणत्याही विशिष्ट धार्मिक उत्सवादरम्यान 'जय माता दी'चा घोष केला असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. 


या प्रकारामुळे तक्रारदार आणि सनातन धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, तक्रारदाराच्या धार्मिक भावनांचा अपमान करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवून प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.  हा प्रकार कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा असल्याचे तक्रारीत म्हटले.