LIC Investment In Stock : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी (LIC Insurance) असण्यासोबतच सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदारही आहे. एलआयसीकडून शेअर बाजारात गुंतवणूक (LIC Investment in Share Market) केली जाते. एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये (LIC Portfolio) सुमारे 260 कंपन्यांचे शेअर्स आहेत. यंदाच्या वर्षी एलआयसीने शेअर बाजारातून 2.28 लाख कोटी रुपये कमावले आहेत. Ace इक्विटी डेटानुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, LIC च्या एकूण होल्डिंग्सचे बाजार मूल्य 9.61 लाख कोटी रुपये होते. आता हेच बाजार मूल्य 11.89 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एलआयसीच्या शेअरहोल्डिंग आणि सप्टेंबर अखेरच्या शेअर्सच्या सध्याच्या बाजारभावाच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले आहे.
एलआयसीच्या पाच टॉप गेनर्समध्ये कोल इंडिया, लार्सन अँड टुब्रो, बजाज ऑटो, टाटा मोटर्स आणि NTPC यांचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात लार्सन अँड टुब्रोमधील एलआयसीच्या स्टेकचे मूल्य 36,165 कोटी रुपयांवरून 52,786 कोटी रुपये झाले आहे. यावर्षी या शेअर्समध्ये 67 टक्क्यांहून अधिक तेजी आली आहे. गेल्या आठवड्यात त्याने विक्रमी उच्चांक गाठला होता. या कालावधीत कंपनीतील एलआयसीच्या होल्डिंगचे मूल्य 46 टक्क्यांनी वाढले आहे. लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स पुढील वर्षीही तेजीत असतील असा अंदाज, शेअर बाजार तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
कोणत्या स्टॉक्सने एलआयसी मालामाल?
गेल्या एका वर्षात सरकारी कंपनी कोल इंडियामधील एलआयसीच्या होल्डिंगचे मूल्य 15,266 कोटी रुपयांवरून 24,087 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. यंदा या शेअरची किंमत 63 टक्क्यांनी वधारली आहे. कंपनीतील एलआयसीच्या होल्डिंगचे मूल्य 58 टक्क्यांनी वाढले आहे. एनटीपीसीमधील एलआयसीच्या होल्डिंगचे मूल्य 86 टक्क्यांनी वाढून 2,400 कोटी रुपये झाले आहे. या स्टॉकने नुकताच आतापर्यंतचा सर्वाकालिन उच्चांक गाठला होता.
टाटा मोटर्सने गेल्या एका वर्षात एलआयसीला बंपर परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी, कंपनीतील एलआयसीच्या होल्डिंगचे मूल्य 6,722 कोटी रुपये होते, जे आता 13,519 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
या कालावधीत, अदानी पोर्ट्स आणि SEZ मधील LIC च्या होल्डिंगचे मूल्य रु. 16,156 कोटींवरून 19,969 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. सुझलॉन एनर्जीमध्ये एलआयसीच्या होल्डिंगचे मूल्य 148 कोटी रुपयांवरून 519 कोटी रुपये आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये 2,778 कोटी रुपयांवरून 6,328 कोटी रुपये झाले. LIC च्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या किमान 21 स्टॉक्सने यावर्षी मल्टीबॅगर परतावा दिला आहे. यामध्ये बीएसई 328 टक्के परताव्यासह अव्वलस्थानी आहे. त्याचप्रमाणे रेल्वे विकास निगमने यावर्षी 160 टक्के परतावा दिला आहे.
पुढील वर्ष एलआयसीसाठी कसे असणार?
पुढील वर्ष भारतीय शेअर बाजारासाठीही चांगले असेल, असे बहुतांश फंड व्यवस्थापकांचे मत आहे. या काळात देशात देशी-विदेशी गुंतवणूक सुरू राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षात आत्तापर्यंत, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देशात 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. तर विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 22 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. मात्र, तज्ज्ञांनुसारे, पुढील वर्षी स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये जास्त परतावा अपेक्षित नाही.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून कोणताही गुंतवणूक सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण असते. गुंतवणूक करण्याआधी शेअर बाजार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)