Ram Charan Fans Accident : डिसेंबर 2024 मध्ये अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमियरवेळी मोठी दुर्घटना होऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता. आता 'गेम चेंजर'च्या इव्हेंटनंतर अपघात होऊन दोन चाहत्यांचा मृत्यू झाला आहे. अभिनेता रामचरण याचा बहुप्रतिक्षित चित्रपट गेम चेंजरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकताच गेम चेंजर चित्रपटाला प्री-रिलीज इव्हेंट पार पडला. या इव्हेंटवरुन परतताना दोन चाहत्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


'गेम चेंजर' चित्रपटाच्या इव्हेंटनंतर अपघात


आता राम चरणचा आगामी 'गेम चेंजर' चित्रपटच्या प्री-रिलीज इव्हेंटनंतर अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री राजमुंद्री येथे 'गेम चेंजर' चित्रपटाच्या प्री-रिलीझ कार्यक्रमाला त्याच्या दोन चाहत्यांनी हजेरी लावली. यानंतर अभिनेता राम चरणच्या दोन चाहत्यांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमानंतर घरी परतताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. राम चरण आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. 'गेम चेंजर' चित्रपटाच्या निर्मात्याने कार्यक्रमानंतर झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या लोकांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.


दोन चाहत्यांचा अपघातात मृत्यू


राम चरणच्या 'गेम चेंजर' चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला हजेरी लावल्यानंतर दोन चाहते बाईकवरून घरी परतत असताना रस्ते अपघातात दोघांचाही जीव गमवावा लागला. याप्रकरणी रंगमपेटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातातील मृतांची नावे अरवा मणिकंता (23 वर्ष) आणि ठोकडा चरण (22 वर्ष) अशी आहेत. 


रस्ता अपघातात दोन जणांचा मृत्यू 


चित्रपटाचे निर्माते दिल राजू यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही चाहत्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन निर्माते दिल राजू यांनी दिलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना निर्माते दिल राजू यांनी मृतांना श्रद्धांजली वाहताना सांगितलं की, "गेम चेंजर चित्रपटाच्या कार्यक्रमातून परतल्यानंतर दोन चाहत्यांचा मृत्यू झाला. तेव्हा पवन कल्याण यांनी मला विचारले की या कार्यक्रमांना काही पर्याय आहे का, कारण एवढ्या मोठ्या कार्यक्रमानंतर काहीही दुर्दैवी घटना घडते, तेव्हा किती दुःख होते, हे त्यांनी सांगितले".




महत्त्वाच्या इतर बातम्या :


लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान