Rajinikanth on Aishwarya : माझे वडिल संघी असते तर, त्यांनी लाल सलाम सारखा सिनेमा केला नसता, असे वक्तव सुपरस्टार रजीनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) हिने काही दिवसांपूर्वी केले होते. दरम्यान, आता रजनीकांत यांनी मुलीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रजनीकांत (Rajinikanth) मुलीच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. माझ्या मुलीने 'संघी' हा शब्द वाईट अर्थाने वापरला नाही, असे स्पष्टीकरण रजनीकांत यांनी दिले आहे.
रजनीकांत लाल सलाम या सिनेमामुळे चर्चेत
दाक्षिणात्य अभिनेता आणि सुपरस्टार रजनीकांत सध्या लाल सलाम या सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच लाल सलाम या सिनेमाचा ऑडिओ लाँच इव्हेंट पार पडला. यावेळी रजनीकांतची मुलगी आणि सिनेमाची दिग्दर्शक ऐश्वर्या देखील उपस्थित होती. यावेळी ऐश्वर्याने मनोगत व्यक्त केले होते. "माझे वडिल संघी नाहीत", असे ऐश्वर्या म्हणाली होती. दरम्यान, यानंतर ऐश्वर्या आणि रजनीकांत यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर रजनीकांत यांनी संघी या शब्दाबाबत मौन सोडले आहे. ऐश्वर्याला संघी हा शब्द वाईट अर्थाने वापरायचा नव्हता, असे रजनीकांत म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाली होती ऐश्वर्या?
लाल सलाम या सिनेमाचा ऑडिओ लाँच इव्हेंट काही दिवसांपूर्वी पार पडला. यावेळी ऐश्वर्याने वडील रजनीकांत यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत टीकेला प्रत्युत्तर दिले होते. ऐश्वर्या म्हणाली होती की, सोशल मीडियावर माझ्या वडिलांना संघी म्हटले जात आहे. माझे वडिल संघी नाहीत, ते संघी असते तर त्यांनी लाल सलाम सारखा सिनेमा केला नसता. नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगबाबत ऐश्वर्याने नाराजी व्यक्त केली. मात्र, आता रजनीकांत यांना मुलीच्या समर्थनार्थ मैदानात उतरावे लागले आहे. रजनीकांत मुलीचे समर्थन करताना म्हणाला, माझ्या मुलीने संघी हा शब्द कधीही वाईट अर्थाने वापरला नाही. ती फक्त म्हणाली की, माझे वडिल आधात्मिक होते, मात्र त्यांना वेगळे लेबल लावण्यात आले.
'लाल सलाम' या सिनेमाचा ऑडिओ लाँच इव्हेंट 26 जानेवारीला चेन्नईतील श्री साईराम इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पार पडला होता. यावेळी रजनीकांत आणि ऐश्वर्याने सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना ऐश्वर्या म्हणाली होती की, "मी सोशल मीडिया जास्त वापरत नाही. मात्र, सोशल मीडियावर काय सुरु आहे? याबाबतची माहिती माझी टीम मला देत असते. माझ्या वडिलांबाबतच्या पोस्ट पाहून मला फार राग येत होता. काही लोकांनी माझ्या वडिलांना फोन करुन तुम्ही संघी असल्याचे म्हटले. मला संघी या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. मी काही जणांना या शब्दाचा अर्थ विचारला. तेव्हा मला सांगण्यात आले की, विशिष्ट विचारधारेचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीला संघी असे म्हटले जाते.
इतर महत्वाच्या बातम्या