हैदराबाद : सुपरस्टार (Rajinikanth) रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयानं एक मेडिकल बुलेटीन जारी केलं आहे. चाहते आणि कलाविश्वाला चिंता लागून राहिलेल्या या मेडिकल बुलेटीनच्या माध्यमातून 'थलैवा'च्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार रजनीकांत यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा आहे. त्यांच्या चाचणी अहवालांमध्ये कोणतीही चिंतेची बाब नाही.


डॉक्टरांची एक टीम रजनीकांत यांच्या प्रकृतीचा आढावा घेत राहील. ज्या आधारे दुपारनंतर त्यांना रुग्णालयातून रजाही दिली जाण्याची शक्यता आहे. रजनीकांत यांचा रक्तदाब नियंत्रणात आल्याची माहितीही रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.


रुग्णालयाच्या पत्रकानुसार, चाचण्यांचे सर्व अहवाल हाती आले आहेत. त्यामध्ये चिंता करण्याजोगी कोणतीही बाब नाही. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवणार आहे. ज्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार की नाही, याबाबतचा निर्णय़ होईल. पहिल्या दिवसाच्या तुलनेत रजनीकांत यांचा रक्तदाब नियंत्रणात आहे, तर त्यांना झोपेचीही कोणतीच तक्रार नव्हती'.


कोरोना चाचणी निगेटीव्ह...


मागील 10 दिवसांपासून रजनीकांत हे हैदराबादमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटातं चित्रीकरण करत होते. त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर असणाऱ्या दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. ज्यानंतर 22 डिसेंबरला रजनीकांत यांनीही कोरोना चाचणी करुन घेतली. यात ते कोरोना निगेटीव्ह असल्याचं अर्थात त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं. असं असलं तरीही ते विलगीकरणात असल्याचं म्हटलं जात आहे.


राजकारणात दमदार एंट्री


कलाविश्वात आपल्या नावाची एक वेगळीच ओळख प्रस्थापित करणाऱ्या रजनीकांत यांनी आता राजकारणाची वाट धरली आहे. येत्या काळात ते सक्रीय राजकारणात सहभागी होण्याची चिन्हं आहेत. राजकीय वर्तुळात आता त्यांची ही कारकिर्द नेमकी कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.