तामिळनाडू : सुपरस्टार (rajinikanth) रजनीकांत येत्या काळात सक्रीय राजकारणात पदार्पण करणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. किंबहुना याबाबत खुद्द रजनीकांत यांनीही संकेत दिले होते. पण, हा क्षण समीप आलेला असतानाच रजनीकांत यांनी मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. हा निर्णय़ आहे तूर्तास सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा.


काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं रितसर उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून रजाही देण्यात आली. पण, येत्या काळात आपल्या तब्येतीवरच लक्ष देणार असल्याचं सांगत त्यांनी आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये आपण तूर्तास दिसणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.





रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणापासून दुरावा पत्करला असला तरीही जनतेसाठी आपण कायमच काम करत राहणार असल्याचा विश्वासही दिला. त्यांच्या या घोषणेमुळं आता अनेकांनी निराशा झाली, तर रजनीकांत यांनी आपल्या प्रकृतीसाठी हा निर्णय घेतल्यामुळं अनेकांनीच त्यांच्या या निर्णय़ाचं स्वागतंही केलं.


रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याच्या दोन दिवसांनंतरच थलैवा रजनीकांत यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला. पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये लिहिलेलं, 'अतीव जड अंत:करणाने मी सांगू इच्छितो की, मी राजकारणात प्रवेश करु शकत नाही. हा निर्णय आणि त्याबाबतची माहिती देणं किती वेदनादायक आहे हे माझ्याहून चांगलं कोणीच जाणत नाही. राजकारणात प्रवेश न करताच मी जनतेची सेवा करणार आहे.'


आपल्या या निर्णामुळं चाहते आणि समर्थकांची निराशा झालीच असेल, त्याबाबत या महान अभिनेत्यानं दिलगिरीही व्यक्त केली आहे. दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकांपूर्वी पाच महिन्यांआधीच रजनीकांत त्यांच्या राजकीय पक्षाची स्थापना करत सक्रिय राजकाराणात येण्याची चिन्हं होती. पण, हा क्षण जवळ आलेला असतानाच सद्यपरिस्थितीमुळं त्यांना हा निर्णय बदलावा लागला.