मुंबई : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय क्रिकेट संघानं विजयी खेळी केली आणि क्रीडारसिकांची मनं जिंकली. (Ind vs Aus) भारतानं बॉक्सिंग डे कसोटीत (boxing day test) ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरीही केली. संघाच्या या विजयावर आता क्रीडा आणि इतर सर्वच क्षेत्रांतुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.


ऑस्ट्रेलियाच्या संघानं दिलेलं 70 धावांचं आव्हान स्वीकारत भारतीय खेळाडूंनी दोन गडी गमावत पूर्ण केलं. ज्यानंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या (Ajinkya Rahane) अजिंक्य रहाणेच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. क्रीडा प्रेमी, अभ्यासक, विश्लेषक या साऱ्यांसोबतच संघातील माजी खेळाडूही त्याचं कौतुक करताना दिसले. दरम्यान, अजिंक्य रहाणेच्या खेळीबद्दल त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणूनही गौरवण्यात आलं.


संघाचा विजय, कर्णधाराचं संयमी नेतृत्व याचीच झलक इथं पाहायला मिळाली. जे पाहून आपल्या तुफानी फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वीरेंद्र सेहवाग, यानं रहाणेच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली. तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानंही संघातील काही अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नोंदवल्या गेलेल्या या विजयाची नोंद घेतली.


तिथं भारतात परतलेल्या विराट कोहली यानंही संघातील खेळाडूंना शाबासकी दिली. यावेळी तो अजिंक्यच्या नेतृत्त्वाची प्रशंसा करण्यासही विसरला नाही. अतिशय सुरेखपणे त्यानं केलेल्या नेतृत्त्वावरही विराटनं ट्विटमधून प्रकाशझोत टाकला.














विराट कोहलीच्या अनिपस्थितीत संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेनं सर्वांचाच विश्वास सार्थ ठरवला. अनेकांच्याच अपेक्षांचं ओझं घेऊन तो मैदानात आला आणि पाहता पाहता, आपल्या संयमी नेतृत्त्वाच्या बळावर संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला.