Raja Gosavi Brother : मराठी सिनेसृष्टीमधलं राजपर्व असा जेव्हा जेव्हा उल्लेख केला जातो, त्या त्या वेळी राजा गोसावी (Raja Gosavi) हे अगदी आग्रहाने घेतलं जातं.  मराठी सिनेमात निरोगी विनोदाची मुहूर्तमेढ मास्टर विनायकांनी रोवली असली, तरी ती पुढे समर्थपणे राजा गोसावी यांनी चालवली. राजा गोसावी खऱ्या अर्थाने चतुरस्र कलावंत होते. त्यांनी रंगविलेला मध्यमवर्गीयांपासून ते शहरी नायक रसिकांना मनापासून भावला. त्यामुळे आजही हा नटसम्राट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. पण असं असलं तरीही या नटसम्राटाच्या कुटुंबाची अवस्था सध्या फारच बिकट असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. प्रत्येक कलाकार जोपर्यंत रंगभूमीवर आहे तोपर्यंतच त्याचं आयुष्य सगळ्यांसमोर आहे, अशीच काहीशी अवस्था राजा गोसावी यांचे कनिष्ठ बंधू मुकुंद गोसावी आणि त्यांच्या पत्नीची आहे. 


 पुण्यात काही दिवसांपूर्वीच झालेल्या पावसामुळे हाहाकार माजवला होता. राजा गोसावी यांचे कनिष्ठ बंधू मुकुंद गोसावी हे त्यांच्या पत्नीसह पुण्यातील सिंहगड रोड येथील विठ्ठलवाडी परिसरात राहतात. पुण्यात 4 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे या परिसरात पाणी साचलं, तेव्हा त्यांच्याही घरात पाणी शिरलं होतं. त्यांची सध्याची जी अवस्था आहे, या सगळ्यावर राजा गोसावी यांचे कनिष्ठ बंधू मुकुंद गोसावी यांनी 'सकाळ वृत्तसंस्थे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 


'45 वर्षे रंगभूमीवर काम केलं'


मुकुंद गोसावी यांनी म्हटलं की, राजा गोसावी माझे मोठे बंधू. त्यांनीच मला लहानाचं मोठं केलं आणि करंगळीला धरुन रंगभूमीवर उभं केलं. माझ्या अंगातली कला आणि गाणं बघून मला माझ्या थोरल्या बंधूंनी राजा भाऊंनी मला एका नाटकात भूमिका दिली. राम गणेश गडकरींच्या 'भावबंधन'मध्ये मी मोरेश्वरची भूमिका केली. त्यानंतर 'पुण्यप्रभाव', 'एकच प्याला', 'नवरा माझ्या मुठीत गं', 'नटसम्राट', 'अग्निपथ' अशी नाटकं आणि 'ठाकरे', 'आनंदी गोपाळ', 'हा खेळ सावल्यांचा' हे सिनेमे केले. 45 वर्ष रंगभूमीवर काम केलं. त्या कामाचं आज असं फळ मिळतंय. कारण आता फक्त 2200 रुपये पेन्शन मिळते, बाकी काही नाही. बायको काही लोकांचा स्वयंपाक करते त्यावर आमचा काय तो उदरनिर्वाह आहे. 


'पाण्याजवळ आणि पाहुण्यांपासून लांब अशी अवस्था'


मुकुंद गोसावी यांच्या पत्नीने घराची अवस्था सांगताना म्हटलं की, 'पहिल्यांदा 2019 मध्ये पाणी आलं. आम्ही झोपलो होतो, लाईट गेली आणि मी उठले तेव्हा गुडघ्यापर्यंत पाणी साचलं होतं. बाहेरही खूप पाणी, अर्धा तास होऊन गेला तरी कुणी फोन उचलायलाही तयार नाही. आता जे पाणी घरात आलं ती ही चौथी वेळ आहे. फक्त 2022 मध्ये पाणी आलं नाही, नाहीतर दरवर्षी एकदातरी घरात पाणी येतं. त्यामध्ये फ्रिज गेला, वॉशिंग मशीन गेली. '


'पाण्यापासून जवळ आणि पाहुण्यापासून लांब अशी अवस्था झालीये. पाहुणे कुणीच यायला तयार नाही.  एवढं पाणी येऊन गेलं पण कुणीच चौकशी करायला तयार नाही. सगळीकडून पाणी येतं आणि नुसतं बघत बसावं लागतं', असं म्हणंत मुकुंद गोसावी यांनी त्यांची वेदनादायी अवस्था सांगितली आहे. 


'म्हातारपणाची काठीही परमेश्वराने हिरावून घेतली'


मुकुंद गोसावी यांनी पुढे म्हटलं की, मुलाला पोटात काविळ झाली आणि 14 वर्षांपूर्वी तो गेला. मुलांच्या समोर नटसम्राटाने प्राण सोडले पण अभिनेत्याच्या समोर मुलं जेव्हा प्राण सोडतात तेव्हा काय होतं मला विचारा. नटसम्राटाच्या नाण्याची दुसरी बाजू मी आहे.  म्हातारपणाची काठीही परमेश्वराने हिरावून घेतली. आता आम्हाला कुणाचाच आधार नाही. सरकारकडून आम्हाला पूरग्रस्त म्हणून 1 बीएचके दिलाय. सगळी कादगपत्रही तयार आहेत, पण अजून किल्ली ताब्यात दिली नाही.


ही बातमी वाचा : 


Marathi Movie : 'देवमाणूस' फेम अभिनेता आता सांभाळणार दिग्दर्शनाची जबाबदारी, प्रसाद ओक मुख्य भूमिकेत