बुर्ज : प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतह अली खान (Rahat Fateh ali khan) यांस दुबईतील विमानतळावरुन अटक करण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियातून समोर आले होते.. दुबईतील बुर्ज दुबई पोलीस (dubai) स्टेशनमध्ये राहत फतेह अली खान यांच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली होती. मॅनेजर सलमान अहमद यांच्या तक्रारीनंतर दुबई पोलिसांनी (Police) ही अटकेची कारवाई केल्याचंही या वृत्तामध्ये म्हटलं होतं. मात्र, माझ्या अटकेचं वृत्त खोडसाळपणा असून निराधार असल्याचं स्वत: राहत फतह अली खान यांनी व्हिडिओच्या माध्यमातून थेट दुबईतून सांगितलं आहे.

  


दुबईतील एका कॉन्सर्टवरुन गायक राहत फतह अली खान आणि त्यांचा मॅनेजर अहमद सलमान यांच्यामध्ये एका शो संदर्भाने वाद झाला होता. शोचे आयोजन आणि आर्थिक देवाण-घेवाणीवरुन दोघांमधील हा वाद पोलिसांत गेल्यानंतर आता पाकिस्तानी गायकावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. विशेष म्हणजे दुबईतील शो केल्यानंतर परतत असताना दुबई पोलिसांनी थेट विमानतळावरुनच गायकास अटक केल्याचंही सोशल मीडियात म्हटलं होतं. मात्र, आता या सगळ्या वृत्तांना निराधार ठरवत स्वत: राहत फतह अली खान यांनीच सत्य सांगितलं आहे.


तुम्हीच माझी ताकद 


मी राहत फतह अली खान, तुमचा राहत फतह अली खान आहे. सध्या मी दुबईत गाणे रेकॉर्ड करण्यासाठी आलोय. सर्वकाही ठीक आहे, कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नका, खोट्या बातम्यांवर लक्ष ठेऊ नका, असे म्हणत अटक झाल्याचे वृत्त पाकिस्तानी गायक खान यांनी फेटाळले आहे. तसेच, माझे शत्रू जे विचार करत आहेत, तसं काहीही नाही. लवकरच शोच्या माध्यमातून मी आपल्यासमोर येईल. त्यावेळी, माझ्या सुपरहीट गाण्यांना तुम्हीही मोठी दाद द्याल. कारण, तुम्हीच माझी ताकद आहात, माझे चाहते, फॅन्स हीच माझी शक्ती आहे, असेही राहत फतह अली खान यांनी ट्विट करुन व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे.  




नोकरालाही कानशिलात लगावल्याने होते चर्चेत


दरम्यान, यापूर्वीही गायक राहत फतह अली खान मोठ्या वादात अडकले होते. त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये राहत फतह अली खान एका व्यक्तीला चप्पलेने मारताना दिसले. मात्र, या व्हिडीओची जबाबदारी घेत त्यांनी माफीही मागितली होती. व्हिडिओत राहत फतेह अली खान नोकराला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केले होते. त्यानंतर, अली खान यांना उपरती आली अन् त्यांनी माफी देखील मागितली होती. दारुची बाटली गायब झाल्याने त्यांनी नोकराला चप्पलेने मारहाण करण्यात आल्याची माहिती पुढे आली होती. 


हेही वाचा


क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेले काँग्रेसचे दोन आमदार फुटणार?; महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा