Pushpa 2 Hyderabad Stampede : पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियरवेळी झालेल्या एका दुर्घटनेत महिलेला जीव गमवावा लागला. हैदराबादमधील संध्या सिनेमाबाहेर झालेल्या अपघातात एका महिलेच्या मृत्यूवर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पुष्पा 2 चित्रपटाच्या हैदराबाद येथे झालेल्या प्रीमियरवेळी चेंगरीचेंगरीची भीषण दुर्घटना घडली होती. यावर आता अल्लू अर्जूनने दु:ख व्यक्त केलं आहे. याशिवाय, अल्लू अर्जूनने मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू, अल्लू अर्जूनची पहिली प्रतिक्रिया
हैदराबादमधील संध्या सिनेमा हॉलमध्ये 'पुष्पा 2 : द रुल' या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेवर अल्लू अर्जुनने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. या घटनेवर बोलताना त्याने शोक व्यक्त केला आहे. अल्लू अर्जूनने अपघातात मृत्यू झालेल्या महिलेबद्दल भावनिक शोक व्यक्त केला आणि कुटुंबाला भावनिक, आर्थिक आणि सर्वतोपरी मदत करणार असल्याचं सांगितलं.
20 वर्षांच्या कारकिर्दीत...
अल्लू अर्जूनने एक व्हिडीओ जारी करत या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने सांगितलं की, जेव्हा त्याला या घटनेची माहिती मिळाली तेव्हा तो आणि 'पुष्पा 2' ची संपूर्ण टीम मानसिकरित्या खूप अस्वस्थ झाली होती. अल्लू अर्जुन पुढे म्हणाला की, त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत असा कोणताही अपघात घडला नाही, पण संध्या थिएटरच्या बाहेर पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये एका महिलेचा मृत्यू आणि एका मुलाला झालेल्या दुखापतीबद्दल त्याला खूप दुःख झालं आहे.
मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत
या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनने मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. याशिवाय व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनने लोकांना आवाहन केलं आहे की, जेव्हा ते थिएटरमध्ये चित्रपट पाहायला जातात, तेव्हा त्यांनी स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घ्यावी आणि सर्व खबरदारी घेऊन सुरक्षितपणे घरी परतावं. ट्विटरवर एका पोस्टद्वारे अल्लूने पीडित कुटुंबाला लवकरच भेटणार असल्याचंही सांगितलं आहे.
पाहा अल्लू अर्जूनचा व्हायरल व्हिडीओ
महत्त्वाच्या इतर बातम्या :