मुंबई : पुष्पा-2 या चिपटाच्या हैदराबादमधील संध्या या चित्रपटगृहातील प्रिमियमदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता. या चित्रपटगृहासमोर झालेल्या चेंगराचेंगरीत या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेला अल्लू अर्जुन चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्याविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर अटकेचीही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाला हवा मिळाल्यानंतर अल्लू अर्जुनने या महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी महिलेच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत केली आहे. 


मृत महिलेच्या कुटुंबाला मदत


मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी (23 डिसेंबर) मृत महिलेच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये दिले आहेत. याच मृत महिलेच्या मुलाचा यरनेनी रुग्णालयात उपचार चालू आहे. याच रुग्णालयात जात पुष्पा-2 चित्रपटाचे निर्माते नवीन यरनेनी यांनी मृत महिलेच्या कुटुंबाला ही आर्थिक मदत दिली आहे. महिलेच्या मृत्यूमुळे नवीन यरनेनी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी आम्हाला मृत महिलेच्या कुटुंबाला मदत करायची होती, त्यामुळे ही मदत दिली आहे, असे सांगितले.  


पुष्पा-2 चित्रपटाचे निर्माते नेमकं काय म्हणाले?


'ही एक फार दुर्दैवी घटना आहे. या घटनेमुळ आम्हाला फार दु:ख झालं. या महिलेच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाची फार मोठी हानी झालेली आहे. रुग्णालयात ज्या मुलावर सध्या उपचार चालू आहेत, त्याची आम्ही भेट घेतली आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टर पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत ाहेत. आम्ही मृत महिलेच्या कुटुंबाला पूर्ण क्षमतेने मदत करू इच्छितो. त्याचा एक भाग म्हणून आम्ही ही आर्थिक मदत केली आहे, असे नवीन यरनेनी यांनी सांगितले. 


महिलेच्या मृत्यूचे राजकीय पडसाद 


पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रिमयरदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे जगभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेला नंतर राजकीय वळणही मिळाले. तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी थेट विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत अल्लू अर्जुनच या महिलेच्या मृत्यूला कारणीभूत आहे, असे सांगितले. सुरक्षेच्या कारणामुळे या थियटरमध्ये कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र असे असूनही हा कार्यक्रम घेण्यात आला होता, असेही रेड्डी यांनी विधानसभेत सांगितले होते. 






अल्लू अर्जुन नेमकं काय म्हणाला होता?


अल्लू अर्जुन आपल्या कारच्या छतावर गेला. तिथे रोड शो करण्यात आला. त्यामुळेचे त्या परिसरात चेंगराचेंगरीचा स्थिती निर्माण झाली. या घटनेचे राजकीय पडसाद उमटल्यानंतर अल्लू अर्जुनला अटक करण्यात आलं होतं. त्याला एक रात्र तुरुंगात घालावी लागली होती. दरम्यान, अल्लू अर्जननेही महिलेच्या मृत्यूमुळे दु:ख व्यक्त केलेलं आहे. तो एक दुर्दैवी अपघात होता. यामध्ये कोणाचीही चूक नाही. दुर्दैवाने ती चुक घडली, असे अल्लू अर्जुनने म्हटलेले आहे. 


हेही वाचा :


स्विमिंग पूल, मोठं गार्डन अन् बरंच काही, अल्लू अर्जुनचं 100 कोटींचं घर नेमकं कसं?


Sunny Leone : सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...