मुंबई : भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राने आणखी एक नवी जबाबदारी आता आपल्या शिरावर घेतली आहे. अर्थात तिचा फॅशन सेन्स आणि तिची लोकप्रियता लक्षात घेऊन तिला ती जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियांका चोप्रा-जोनास आता ब्रिटिश फॅशन कॉन्सिलची दूत म्हणजे अ‍ॅम्बेसिडर बनली आहे. पुढच्या वर्षभरासाठी ती त्या फॅशन कॉन्सिलसाठी काम करणार आहे. प्रियांकानेच ट्विटरवर ही माहिती दिली.


प्रियांका चोप्रा हे नाव आता जागतिक फॅशन इंडस्ट्रीला नवं राहिलेलं नाही. मिस वर्ल्ड झाल्यानंतर प्रियांकाची चर्चा जगभरात आहेच. त्यानंतर प्रियांका भारतात काम करत असली तरी तिचा चााहता वर्ग जगभरात होता. आता तिने निकसोबत लग्न केल्यानंतर अमेरिकेत सेटल झाली आहे. तिथे ती सातत्याने सोशल वर्क करत असते. अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये ती काम करते आहे. तिच्या कामाची दखल घेऊनच ब्रिटिश फॅशन कॉन्सिलने तिला आपली दूत म्हणून नेमलं आहे.





नव्या जबाबदारीची माहिती देताना प्रियांका म्हणते, माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे. ब्रिटिश फॅशन कॉन्सिलने माझी दूत म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे आता पुढचं वर्षंभर मला त्यावर काम करावं लागणार आहे. ब्रिटनमधल्या फॅशन इंडस्ट्रीला बूस्ट करण्यासाठी ही नेमणूक झाल्यामुळे आता मला त्यावर काम करावं लागेल. पुढचं वर्षभर मी लंडनमध्ये असेन. अनेक नव्या गोष्टी आता आम्ही लोकांसमोर घेऊन येणार आहोत.


प्रियांकाच्या या नेमणुकीमुळे प्रियांका पुन्हा एकदा अभिनयासोबत फॅशन इंडस्ट्रीत सक्रिय होणार हे उघड आहे. प्रियांका चोप्रा येत्याकाळात अनेक नव्या नव्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणार आहे. आगामी काळात तिच्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये 'मॅट्रिक्स 4' चा समावेश होतो. शिवाय नेटफ्लिक्सच्याही अनेक महत्वाच्या सिरीजमध्ये ती आहे त्यापैकी 'द व्हाईट टायगर' हा त्यातला महत्वाचा प्रोजेक्ट आहे. शिवाय हॉलिवूडशी संबंधित इतर अनेक लोकांसोबत ती काम करते आहे. या लोकांत गायिका सिलिन डियॉनचाही समावेश आहे.