Laxmikant Berde :  तो आला, त्यानं पाहिलं अन् त्यानं जिंकून घेतलं सारं...असं जेव्हा जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा तेव्हा मराठी प्रेक्षकांसमोर लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) हे नाव उभं राहतं. विनोदाच्या झऱ्यात प्रेक्षकांना खळखळून हसवणारे 'लक्ष्या'मामा आजही प्रत्येकाच्या मनात आहेत. त्यांच्या प्रत्येक सिनेमावर तितकंच भरभरुन प्रेम केलं जातं. मराठीसह हिंदी सिनेमेही त्यांनी गाजवले आणि मराठी रंगभूमीला एक नवा आशय निर्माण करुन दिला. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांचा 70 वा वाढदिवस आहे. त्यांच्या आठवणीत त्यांची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी पोस्ट केली आहे. 


लक्ष्मीकांत बेर्डे यांनी बई मराठी साहित्य संघ या निर्मिती संस्थेमध्ये कर्मचारी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर काही मराठी रंगभूमीवरील नाटकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. पण त्यांना खरी प्रसिद्धी दिली टूर टूर या मराठी नाटकाने. त्याचप्रमाणे त्यांची विनोदी नाटकंही तितकीच गाजली.       


प्रिया बेर्डे यांची पोस्ट काय?


प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, '70वर्ष....आज जन्मदिवस अजूनही तुमचं गारुड लोकांच्या मनावर आहे, एक अभिनेता, चांगला माणूस म्हणून आज ही लोक तुमच्याबद्दल तेवढ्याच उत्साहाने बोलतात.विनोद अनेक रुपाने समोर आला कधी दादागिरीने तर कधी विनोदाचा सम्राट, तर कधी भोळा भाबडा राजा म्हणून पण या महारथींच्या मांदियाळीत या कर्त्याने स्वतःची शैली, स्वतःच वेगळेपण सिद्ध केलं. त्यांना कुठलीच पदवी दिली गेली नाही तो कायम सगळ्यांसाठी लक्ष्याच राहिला.. आणि राहणार फक्त 'लक्ष्या'...'


त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या टूर टूर या मराठी रंगभूमीवरील नाटकात त्यांची पहिली प्रमुख भूमिकाच फार गाजली. या नाटकातील त्यांच्या विनोदी शैलीचंही फार कौतुक झालं. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 1984 मध्ये आलेल्या 'लेक चालली सासरला' या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले . अशोक सराफांसोबतची त्यांची जोडी ही मराठी सिनेसृष्टीसाठी "अशोक-लक्ष्या" युग म्हणून स्मरणात राहिली आहे. हसवणाऱ्या लक्ष्यामामांनी 'एक होता विदुषक' या सिनेमातून गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत. 






ही बातमी वाचा : 


Mahadev Jankar : अभिनेत्री मेहक चौधरीला मुंबईतून उतरवलं; 2 दिवसांपूर्वीच प्रवेश केला, महादेव जानकरांनी दिलं तिकीट