India vs New Zealand 2nd Test Rohit Sharma : पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. भारतीय संघाला प्रत्येक विभागात न्यूझीलंडने चिटपट केले. परिणामी भारताला 113 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. भारताच्या या पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माचे पहिले वक्तव्यही आले आहे.  


भारतीय कर्णधार रोहित शर्माने हा पराभव सगळ्या खेळाडूंचे अपयश असल्याचे म्हटले. म्हणजेच रोहितने कोणत्या एका खेळाडूला नाही तर संपूर्ण संघाला पराभवाचा जबाबदार धरले आहे. सामन्यानंतर ब्रॉडकास्टरशी बोलताना रोहित म्हणाला, हे संघाचे अपयश आहे. मी तसा माणूस नाही जो फक्त फलंदाज किंवा गोलंदाजांना दोष देईल.  


रोहित म्हणाला, आम्हाला जे वाटले ते घडले नाही. याचे श्रेय न्यूझीलंडला द्यावे लागेल. ते आमच्यापेक्षा चांगले खेळले. काही विशेष संधींचा फायदा घेण्यात आम्ही अपयशी ठरलो. बोर्डावर चागंल्या धावा करण्याइतपत आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. अर्थात जिंकण्यासाठी तुम्हाला 20 विकेट्स घ्याव्या लागतील, पण फलंदाजांनाही धावा फलकावर लावाव्या लागतील. न्यूझीलंडला 250 च्या आसपास रोखणे ही मोठी लढाई होती, परंतु आम्हाला माहित होते की ते आव्हानात्मक असणार आहे. जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा ते 200/3 होते आणि आमच्यासाठी परत येऊन त्यांना 259 धावांवर बाद करणे हा एक चांगला प्रयत्न होता.


खेळपट्टीबद्दल रोहित काय म्हणाला?


भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ही खेळपट्टी नव्हती जिथे खूप काही घडत होते. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. पहिल्या डावात आम्ही न्यूझीलंडच्या धावसंख्येच्या थोडे जवळ गेलो असतो तर कदाचित परिस्थिती थोडी वेगळी असती. आम्ही वानखेडेवर चांगली कामगिरी करू आणि ती कसोटी जिंकण्याचा प्रयत्न करू.


पुणे कसोटीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डेव्हन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या, तर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात कर्णधार टॉम लॅथमच्या 86 धावांच्या शानदार खेळीमुळे 255 धावा केल्या. तर मिचेल सँटनरने (पहिल्या डावात 7 विकेट्स) न्यूझीलंडसाठी घातक गोलंदाजी केली, ज्यामुळे न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात अवघ्या 156 धावांत आटोपले. अशाप्रकारे भारताला विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु टीम इंडिया 245 धावांवर गडगडली आणि सामना 113 धावांनी गमावला.


याआधी बंगळुरू कसोटीत भारताला न्यूझीलंडकडून 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 46 धावांत गारद झाला आणि हेच त्यांच्या पराभवाचे कारण ठरले.


हे ही वाचा -


WTC 2025 Points Table : टीम इंडियाचा पराभव अन् पाकिस्तानच्या विजयानंतर बदलले WTC पॉइंट टेबल; फायनलची शर्यत झाली रोमांचक