Prashant Sajanikar : महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी प्रशांत साजणीकर यांची शासनाने नियुक्ती केली असून सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते सामान्य प्रशासन विभागात सह सचिव म्हणून कार्यरत होते. प्रशासनाचा गाढा अभ्यास असणारे श्री. साजणीकर यांनी सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असताना 'महाराष्ट्र लोकायुक्त कायदा' - 2024 तयार करण्यात त्यांची मोलाची भूमिका राहिली आहे. त्याशिवाय महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा 2024 तयार करण्यामध्येही त्यांचे योगदान राहिलेले आहे.
त्याचबरोबर गट क - पदभरतीच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षा धोरण निश्चित करण्यामधेही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली असून लिपिक संवर्गाच्या सर्व परीक्षा आयोगाकडे वर्ग करण्याचा निर्णयामध्येही त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. शिवाय विभागीय चौकशीसाठी डी-पोर्टल तयार करण्यामध्येही त्यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागात अप्पर सचिव म्हणून काम
राज्यातील उपसचिव व त्यापेक्षा वरिष्ठ पदांवरील पदोन्नती समितीच्या सदस्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. साजणीकर यांनी जलसंपदा विभागात उपसचिव म्हणूनही काम पाहिले आहे. सन 2006 ते 2014 या दरम्यान उपमुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात अप्पर सचिव म्हणून ते कार्यरत होते. यावेळी नियोजन आणि राज्य रस्ते विषयक कामकाजात त्यांनी मोलाचे कार्य केले आहे.
साजणीकर यांचा प्रशासकीय कामाबरोबरच संत साहित्यावर विशेष अभ्यास आहे. याबाबतचे विपुल लेखन त्यांनी केले असून प्रवास, चित्रपट, साहित्य इत्यादी विषयांवरचे त्यांचे लेखन आजवर वर्तमानपत्र तसेच समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले आहे.
वाचन, पर्यटन, छायाचित्रण यांचा आवडीचा विषय
वाचन, पर्यटन, छायाचित्रण यांचा आवडीचा विषय असून बासरी वादन हा छंदही ते जोपासत आहेत. त्यामुळे दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून आगामी काळात चित्रपट रसिकप्रेक्षक निर्माण करण्यासाठी विविध कार्यशाळा, उपक्रम, अभियान , कार्यक्रम राबविण्यावर भर देणार असल्याचे श्री. साजणीकर यांनी सांगितले. मराठी चित्रपटाकडे वळणाऱ्या उद्नोमुख कलाकारांसाठी विविध उपक्रम हाती घेणार असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर महामंडळाची व्यवसायिकवृद्धीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या