Celebrities reaction on Maharashtra Assembly Election Results 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर (Maharashtra Assembly Election Results 2024) आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये कलाकरांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीच्या भरघोस विजयावर प्रसाद ओक (Prasad Oak), आरोह वेलणकर (Aroh Welankar), अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar), सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) यांच्य प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत.
महायुतीने 236 जागांवर विजय संपादित करत भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने एकूण 137 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपच्या या यशावर राजकीयसह अनेक क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं चित्र आहे. यावर कलाकरांच्या प्रतिक्रियेने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
जय श्री राम! - आरोह वेलणकर
अभिनेता आरोह वेलणकरने त्याच्या सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय. आरोहने त्याच्या पोस्टमधून महाराष्ट्राचे अभिनंदन, असंही म्हटलं. त्याने पोस्ट शेअर करत त्यावर म्हटलं की, हिंदवी स्वराज्य यावे ही तर श्रींची इच्छा! जय श्री राम! अभिनंदन! तसेच त्याने त्याच्या या पोस्टमध्ये दोन फोटोही शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोवर लिहिलं आहे की, ना दिखावा ना श्रेय घेण्याची इच्छा. ते आले शांतपणे आपले काम करुन गेले, त्यांचे काम एकच.... भारत मातेला परम- वैभवावर नेणे. सहयोगी संस्थांचे विशेषत: प्रबोधन मंचाचे मन:पूर्वक आभार!
हिंदूऐक्य चिरायु होवो - प्रसाद ओक
निवडणुकांच्या तोंडावर रिलीज करण्यात आलेला धर्मवीर-2 हा सिनेमा बराच चर्चेत आला. यामध्ये आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे. महायुतीच्या विजयानंतर अभिनेता प्रसाद ओकने प्रतिक्रिया देत म्हटलं की, धर्मो रक्षति रक्षित : हिंदूऐक्य चिरायु होवो, जो हिंदू की बात करेगा वही देश पर राज करेगा...
असंख्य काजव्यांच्या एकत्र येण्याने - अभिजीत केळकर
अभिनेता अभिजीत केळकर याने देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर करत म्हटलं की, असंख्य काजव्यांच्या एकत्र येण्याने रात्रीचा काळोख कमी होती नाही, पौर्मिणेचा चंद्र जरी सौम्य असला तरी रात्र प्रकाशमय केल्याशिवाय राहत नाही..
आज म्हणजे दोन डोळे कमी पडतायत - सलील कुलकर्णी
संगीतकार सलील कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, वाह..वाह.. कमाल...यशस्वी भव.. आज म्हणजे दोन डोळे कमी पडतायत बघायला...