मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सर्वजणांना घरी बसून राहावे लागत आहे. प्रत्येकाच्या मनात एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रलय आला की काय? अशाही शंका आता लोकांच्या मनात यायला लागली आहे. मात्र, आकाशाचे देणे काही आज-उद्या फिटत नाही णि इतक्या लवकर प्रलय होईल, असे काही वाटत नाही, असं कवी संदीप खरे म्हणत आहे. लॉकडाऊनकडे अनेकजण संधी म्हणून पाहत आहेत. कवी संदिप खरे या लॉकडाऊनच्या काळात काय करतात? आताच्या परिस्थितीविषयी त्यांना नेमकं काय वाटतं, या पार्श्वभूमीवर ते आज माझा कट्टा वर आले होते. यावेळी संदीप खरे यांच्या खजिन्यातून उलगडलेल्या, आयुष्यावर भाष्य करणाऱ्या कवितांसह गप्पांची मैफल रंगली.
आपण घरात सुरक्षित राहावे, यासाठी अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी जी मेहनत घेत आहेत. त्या सर्वांचा आपण आदर करायला हवा, अशी विनंती संदिप खरे यांनी व्यक्त केली. आयुष्यात प्रत्येकाला खूप काही गोष्टी करायच्या असतात. मात्र, काही कारणाने त्या राहून जातात. मात्र, आताच्या या लॉकडाऊनमुळे अशा अनेक गोष्टी करता येत आहे. कुटुंबासोबत वेळ घालवतोय. मला पुस्तक वाचायला खूर आवडतात. सध्या मी अशी पुस्तके घरातील सदस्यांना वाचून दाखवत आहे. हे करायला खूप मज्जा येत असल्याचे संदिप यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीला अनुसरून त्यांनी त्यांची एक कविता सादर केली.

सरकारकडून सन्मान नाही; रामायणात प्रभू राम साकारलेल्या अरुण गोविल यांची खंत

प्रलय...
उगाच काय गं छोट्या मोठ्या गोष्टीवरून इतके वाद
उगाच काय माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नाद

मी, तू , जगणे, पृथ्वी, कोणीच इतके वाईट नाही
आधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाही

अगं विरस व्हावा इतके काही उडले नाहीत इथले रंग
स्पेशल इफेक्टस्‌शिवायसुद्धा शहारून येऊ शकते अंग

अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत
अजून तरी दाही दिशा, आपल्या आपल्या जागी आहेत

पैसे भरल्यावाचून अजून, डोळा तारे दिसत आहेत
झाडांच्याही सावल्या, अजून विनामूल्य पडत आहेत

अजून तरी कर नाही, आपले आपण गाण्यावर
‘सा’ अजून ‘सा’ च आहे, ‘रे’ तसाच ऋषभावर

अजून देठी तुटले फूल, खाली पडते जमिनीवर
छाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवर

स्पॉन्सर केल्यावाचू अजून, चंद्र घाली चांदणभूल
अजून कुठल्या वचनाशिवाय, कळी उमलून होते फूल

सागर अजून, गणतीवाचून, लाटेमागून सोडी लाट
अजून तरी कुठली जकात घेत नाही पाऊल वाट

थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन
पाऊस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदून

काही काही बदलत नाही, त्वेषाने वा प्रेमाने
जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने

आकाशाचे देणे काही आज-उद्या फिटत नाही
आणि इतक्या लवकर प्रलय होईल, असे काही वाटत नाही

आपल्या आसपास अशा अनेक गोष्टी असतात ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात मला अशा अनेक गोष्टी समजल्या. अगदी झाडाला पाणी घालताना झाडांशीही संवाद साधता येतो. यावेळी संदिप यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.

Corona Relief | विरारमधील दोन भावांनी कोरोनाला हरवलं, वसईत दोन परिचारिकांचीही कोरोनावर मात