Payal Kapadia :  सध्या जगभरात कान्स या सोहळ्याची चर्चा होती. यामध्ये इतरांसह भारताने देखील आपली विजयी पताका फडकवली. विशेष म्हणजे पायल कपाडिया हिच्या 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' (All we Imagine as Light) या सिनेमाला कान्समधील ग्रँड प्रिक्स सिनेमाला बहुमान मिळाला. याच पायल कपाडिया (Payal Kapadia) विरोधात FTII च्या आंदोलनामुळे खटला दाखल करण्यात आला होता.  तिच्या या यशाचं संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे. इकतच काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पायल कपाडियासाठी पोस्ट लिहत तिचं कौतुक केलं आहे. 


पायलने FTII म्हणजेच 'फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'(FTII) या प्रतिष्ठित संस्थेतून तिचं चित्रपट निर्मतीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. पण तिचा हा काळ FTIIच्या इतिहासात लक्षात राहणारा ठरला आहे. कारण तिच्या शैक्षणिक काळादरम्यान पायल आणि काही विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे FTII त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरुन पुणे पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पायलच्या या यशानंतर तिच्यावरही हा खटला मागे घेण्याचं आवाहनही आता अनेकजण करत आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायलसाठी कौतुकास्पद पोस्ट लिहत तिचं कौतुक केलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, 'पायल कपाडियाचा भारताला अभिमान आहे. तिच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या सिनेमासाठी 77 व्या कान्स  फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.  FTII ची माजी विद्यार्थिनी, तिची उल्लेखनीय प्रतिभा भारतातील समृद्ध सर्जनशीलतेची झलक देऊन जागतिक स्तरावर चमकत आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार केवळ तिच्या अपवादात्मक कौशल्यांचा गौरव करत नाही तर भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या नवीन पिढीला प्रेरणा देतो.' 






काय आहे प्रकरण?


2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आल्यानंतर 2015 मध्ये एफटीआयआयच्या संचालकपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली. गजेंद्र चौहान यांची नियुक्ती ही राजकीय असून त्यांचा विद्यार्थ्यांना कोणताही फायदा होणार नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. चौहान यांच्या नियुक्तीवरून एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल 139 दिवस आंदोलन केले होते. या आंदोलनाला सिनेसृष्टीतील कलाकारांनी आपला पाठिंबा व्यक्त केला होता. 


एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना ट्रोलिंग, अपशब्दाच्या भडिमाराला सामोरे जावे लागले. पायल कपाडियासह आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना  देशविरोधी असल्याचा संबोधण्यात आले. काहींना तर पाकिस्तानतही जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. इतकचं नव्हे तर पुणे पोलिसांत तक्रार दाखल करुन या विद्यार्थ्यांविरोधात खटला देखील दाखल करण्यात आला होता. 


याआधीही मिळाला होता कान्समध्ये मान


दरम्यान कान्समध्ये बहुमान मिळालेला पायलचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी 2017 मध्ये तिच्या 'आफ्टरनून क्लाउड्स' या 13 मिनिटांच्या लघुपटासाठी कान्स स्पर्धेत कोणत्याही श्रेणीसाठी प्रवेश करणारा पहिला भारतीय सिनेमा होता. दरम्यान तिचा सिनेमा हा Cinefondation विद्यार्थी चित्रपट विभागासाठी 16 फिल्म शॉर्टलिस्टसाठी पात्र ठरला. या सिनेमाला FTII ने शांतपणे  पाठिंबा दिला होता. या सिनेमासाठी तिला पुरस्कार मिळाला नव्हता, पण जगभरातून सादर करण्यात आलेल्या 2600 सिनेमांपैकी 16 सिनेमांच्या यादीत तिच्या सिनेमाची निवड करण्यात आली होती.


ही बातमी वाचा : 


Payal Kapadia FTII : ''पोरीनं कान्स गाजवलं, आता तरी खटला मागे घ्या''; ऑस्कर विजेत्या कलाकाराचं FTIIला आवाहन