बीड : राज्याच्या राजकारणात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड (Beed) जिल्ह्यात वेगळ्याच राजकीय वळणात दिसून आला. निवडणुकांपूर्वी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम बीड जिल्ह्यात पाहायला मिळाला. बीडमध्ये महायुतीकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली होती. तर, महाविकास आघाडीने बजरंग सोनवणेंना मैदानात उतरवले होते. त्यानंतर, येथील निवडणूक प्रचारात थेट मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पेटल्याचं दिसून आलं. मात्र, निवडणुकीनंतरही या वादाचे पडसाद कायम दिसत आहेत. बीड जिल्ह्यातील मुंडेंवाडीत दोन्ही समाजातील लोकांना एकमेकांच्या दुकानातून काहीही खरेदी करायचे नाही, असा निर्णय घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल (viral video) झाला आहे. याबाबत, एबीपी माझाने बातमी दिल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक पथकासह थेट मुंडेंवाडीत पोहोचले आहेत. 


बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मुंडेवाडी हे छोटसं गाव सध्या चांगलंचं चर्चेत आलं आहे. या गावातील एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, एका समाजाच्या बैठकीत दुसऱ्या समाजातील व्यक्तींच्या दुकानातून खरेदी न करण्याचं आवाहन केलं जात आहे. विशेष म्हणजे गावच्या सप्त्यातही संबंधित समाजाच्या महाराजांना न बोलवण्याचे आवाहन केलं जात आहे. सध्या हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर, एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले होते. त्यानंतर, बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे थेट पथकासह केज तालुक्यातील मुंडेवाडी येथे पोहोचले आहेत. तसेच, याप्रकरणी कारवाई सुरू असून आरोपीला अटकही केल्याचं त्यांनी एबीपी माझीशी बोलताना सांगितले.


आम्ही मुंडेवाडीत पोहोचलो आहोत, येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. पण, इथे तसा कुठलाही प्रकार नाही. कुठल्याही समाजाने खरेदी करणे किंवा न करण्याचा निर्णय घेतलेला नाही. गावातील नांदूरफाटा येथील काही समाजकंटक त्रास देतात म्हणून अशा पद्धतीने काही घटना घडली. पण, त्यामध्ये जात हा फॅक्टर नसून व्यक्तिगत स्तरावर ते बोललेले होते. मात्र, गावकऱ्यांचं त्या प्रकाराला अनुमोदन नाही. गावचं त्यास समर्थन नाही. गेल्या 15 दिवसांपूर्वीचा तो व्हिडिओ असून गावात गेल्या 15 दिवसात कोणालाही कसलाही फाईन केलेला नाही, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी एबीपी माझीशी बोलताना दिली. 



आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल


व्हिडिओमुळे गावातील सोशल फॅब्रीक खराब होऊ नये म्हणून आम्ही आज गावातील लोकांसोबत बैठक आयोजित केली आहे. नांदूरफाट्यावरही बैठकीचं आयोजन केलं असून ग्रामस्थांना चांगला प्रतिसाद आहे. लोकांमध्ये संवाद आहे, काही विशिष्ट बाबी घडल्या, पण त्या जात म्हणून नसून व्यवसायिक आहेत, असेही ठाकूर यांनी सांगितले. याप्रकरणी व्हिडिओची दखल घेऊन आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. ही बाब गंभीर आहे, आरोपीला ताब्यात घेतलं असून प्रतिबंधक कारवाई केली आहे, असेही पोलीस अधिक्षकांनी सांगितले. तर, गावकरी एकमताचे, एका मनाचे आहेत, गावातील वातावरण शांत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


हेही वाचा


Video: बीडमध्ये मराठा - वंजारी वाद कोण पेटवतंय?, एकमेकांच्या दुकानातून खरेदी नाही, केल्यास मोठा दंड