Pepsi Where's My Jet Netflix Web Series: आजकाल प्रत्येक दुसरा माणूस कोका-कोला किंवा पेप्सी पितो. शीतपेयांच्या क्षेत्रात या दोन्ही कंपन्या खूप जुन्या आणि विश्वासार्ह आहेत. या दोन कंपन्या नेहमीच एकमेकांशी भिडल्या आहेत आणि आजही हा संघर्ष सुरू आहे. या दोन प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये 70 च्या दशकातच संघर्ष सुरू झाला, ज्याला 'कोला वॉर' म्हणतात. कोला वॉर मनोरंजक होती, कारण या दोन्ही कंपनी आपल्या जाहिरातीतून आपण कसे श्रेष्ठ आहोत किंवा आपलंच पेय हे भारी आहे, हे दाखवायचा प्रयत्न सुरु होता. जो आजही पाहायला मिळतो. 


तसं पाहता कोका-कोला पेप्सिकोच्या आधी बाजारात आली होती आणि लोकांची पहिली पसंती देखील होती. त्यामुळे पेप्सीकोला बाजारात पाय रोवण्यासाठी आपल्या मार्केटिंग धोरणात अनेक मोठे बदल करण्याची गरज होती. याचदरम्यान असाही काही काळ आला की, पेप्सीला प्रचंड नुकसान सहन करावे लागले, पेप्सीसोबत असे दोनदा घडले ज्यामुळे कंपनी विकण्याची परिस्थिती निर्माण झाली. मात्र पुढे कंपनीने आपल्या जाहीरतींतून मार्केटमध्ये आपली भक्कम जागा निर्माण केली. मात्र यातली एक जाहिरात पेप्सीच्या अंगाशी आली होती. ज्यावर आता नेटफ्लिक्सवर (Netflix ) Pepsi Where's My Jet नावाची वेबसीरिजही रिलीज झाली आहे.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ... 


ऑगस्ट 1996 मध्ये पेप्सीची एक जाहिरात त्यांच्यासाठी अडचणीची ठरली होती. 1990 च्या दशकाच्या मध्यात पेप्सी-कोला तिची 'पेप्सी स्टफ' प्रमोशनल मोहीम प्रसारित करत होती. जेव्हा तिच्या एका जाहिरातीमुळे कायदेशीर वाद निर्माण झाला. पुढेच हीच जाहिरात पेप्सी कंपनीसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती.


Pepsi Fighter Jet Ad: काय होती जाहिरात? 


पेप्सीच्या जाहिरातीनुसार, लोकांना पेप्सी खरेदी करावी लागत होती, त्यानंतर त्यांना पेप्सीच्या लेबलवरून काही पॉईंट्स गोळा करावे लागत होते. या पॉइंट्सच्या बदल्यात पेप्सीने लोकांना टी-शर्ट, सनग्लासेस यांसारख्या भेटवस्तू देण्याचे जाहीर केले होते. पण या जाहिरातीचा शेवटचा भाग असा होता जिथे पेप्सीने 7 मिलियन (70 लाख) पॉइंट्ससाठी 'हॅरियर जेट' (Harrier Jet) देण्याबद्दल बोललं होत. हे हॅरियर जेट देण्याच्या घोषणेमुळे पेप्सी कायदेशीर वादात सापडली होती.


Pepsi Where's My Jet: नेमकं काय घडलं होत?


पेप्सीने जेट देण्याच्या घोषणेने 21 वर्षीय जॉन लिओनार्डचे लक्ष वेधून घेतले. जॉन लिओनार्ड हा Business Management चा विद्यार्थी होता. लिओनार्डने पेप्सीच्या बाटलीवर एक प्रिंट पाहिली होती. ज्यावर लिहिलं होत की, पेप्सीच्या लेबलऐवजी लोक प्रत्येकी दहा सेंट्समध्ये पेप्सी पॉइंट्स खरेदी करू शकतात. त्यानंतर लिओनार्डने पाच गुंतवणूकदारांना पेप्सी पॉइंट खरेदी करण्यासाठी 700,000 डॉलर्स देण्यासाठी पटवले. लिओनार्डने नंतर पेप्सीला 15 लेबले आणि एक चेक पाठवला. नंतर तो आपल्याला जेट कधी मिळणार याची वाट पाहू लागला. मात्र त्याने जो विचार केला होता, तसं काही घडलं नाही. काही दिवस वाट पाहिल्यानंतर पेप्सीकडून लिओनार्डला एक पत्र पाठवण्यात आलं. त्यात ही जेटची जाहिरात म्हणजे फक्त एक विनोद होता असं त्याला सांगण्यात आलं. कंपनीने त्याला त्याचा 70 लाखांचा चेकही परत केला. यानंतर लिओनार्डने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मात्र या लढाईत पेप्सीच्या बाजूने निकाल लागला.