Pawankhind Movie : सलग दुसऱ्या आठवड्यात ‘पावनखिंड’ची (Pawankhind) जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ला टक्कर देत या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर, चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. नुकत्याच एका हाऊसफुल शोला ‘पावनखिंड’च्या कलाकारांनी हजेरी लावली होती.


मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील कलाकारांना प्रत्यक्षात समोर बघून प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यावेळी प्रेक्षकांनी-चाहत्यांनी आपल्या लाडक्या कलाकारांसोबत फोटो देखील काढले. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्याच मनावर या चित्रपटाने गारुड केले आहे. यावेळी एबीपी माझाने चित्रपटाच्या कलाकारांशी संवाद साधला.


आम्ही भारावून गेलोय : अजय पुरकर


चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आम्ही देखील भारावून गेलो आहोत, असे अभिनेते अजय पुरकर म्हणाले. शिवराज अष्टक हे स्वप्न आम्ही पाहिलं, शिवरायांचा दैदीप्यमान इतिहास लोकांसमोर यावा यासाठीच हे आठ चित्रपट आम्ही हाती घेतले आहेत. पावनखिंडसारखा विषय, ज्याला आज लोकांचा इतका प्रतिसाद मिळतोय हे पाहून आता असं म्हणेन की, हा चित्रपट आता आमचा राहिलेला नाही, तर तो लोकांचा झाला आहे, असे अजय पुरकर म्हणाले.



आमचं व्रत लोकांपर्यंत पोहोचतंय : दिग्पाल लांजेकर


शिवरायांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ‘शिवराज अष्टक’ हाती घेतलंय, ज्यात आम्ही आठ चित्रपट बनवणार आहोत. त्यातल्या पहिल्या दोन चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण, या तिसऱ्या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून वाटतंय की, आमचं व्रत लोकांपर्यंत पोहोचतंय, असे चित्रपटाचे दिग्दर्शक-लेखक दिग्पाल लांजेकर म्हणाले. व्यावसायिकदृष्टीकोन बाजूला ठेवून, आता या चित्रपटाला जो प्रतिसाद मिळतोय ते पाहून कुठेतरी हाती घेतलेलं काम पूर्ण होतंय याचा आनंद होतोय.


देशभरात ‘पावनखिंड’ची घौडदौड!


केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, बंगळूरू, कर्नाटक आणि देशभरातील इतर राज्यातूनही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांनंतर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी स्वराज्याच्या वाटेवरील तिसरं सुवर्णपान 'पावनखिंड' चित्रपटाच्या निमित्ताने उलगडलं आहे.


चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले,  हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या 'पावनखिंड' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha