Panchayat Season 3: ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'पंचायत' (Panchayat) ही वेब सीरिज कमालीची लोकप्रिय झाली. एका खेडेगावात घडणाऱ्या घटनांभोवती वेब सीरिजचे कथानक गुंफण्यात आले आहे. या वेब सीरिजचा पहिला सीझन 2020 मध्ये रिलीज झाला होता. या सीझनला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 2022 मध्ये दुसरा सीझन आला. या दुसऱ्या सीझनलाही तुफान प्रतिसाद मिळाला. आता 'पंचायत'चा तिसरा सीझन (Panchayat Season 3) येणार आहे. या सीझनमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे. 


काही दिवसांपूर्वी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने एका शानदार सोहळ्यात 70 वेब सीरिज, चित्रपटांची घोषणा केली. यामध्ये 'पंचायत 3' ची (Panchayat Season 3) झलक दाखवण्यात आली. या दरम्यान 'पंचायत 3' मधील एक ट्विस्ट समोर आला. 


फुलेरा गावात येणार नवीन सचिवजी


'पंचायत 2' वेब सीरिजच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आमदार गावात झालेल्या अपमानानंतर सचिवाची बदली करण्याचा विचार करत असल्याचे दाखवले. आता, तिथूनच कथानक पुढे जाणार असल्याचा अंदाज आहे. गावात आता गणेश ही व्यक्ती आता नवीन सचिव असणार आहे. 'पंचायत'च्या पहिल्या सीझनमध्ये  "गजब बेइज्जती है"  हा संवाद प्रसिद्ध झाला होता. यावर मीम्सचा पाऊस पडला होता. आसिफ खानने गणेश ही व्यक्तीरेखा साकारली होती.  "गजब बेइज्जती है" हा संवाद आसिफच्या तोंडी नव्हता. तरीही तो प्रसिद्ध झाला. गणेश हा फुलेरा गावाचा जावई असतो. लग्नाच्यावेळी झालेला कथित अपमान, मुलीकडील लोकांनी गैरसोय करणे अशा वेगवेगळ्या कारणांनी वऱ्हाड नाराज असते. आता, हाच जावई फुलेरा गावचा 'सचिवजी'असणार आहे. 


'पंचायत 3' मध्ये सचिवजींची बदली कुठं?


'पंचायत 3' च्या टीझरमध्ये फुलेराचे गावचे लाडके सचिवजी अभिषेकची त्रिपाठी (जितेंद्र कुमार) बदली दुसऱ्या गावात करण्यात येते. अभिषेकच्या जागी गावचा जावई असलेल्या गणेशची फुलेरा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक म्हणून येतो. 


गणेशचे लग्न फुलेरा येथील रहिवासी परमेश्वर (श्रीकांत वर्मा) यांची मुलगी रवीनाशी झाले आहे, परंतु लग्नाच्या दरम्यान त्याला अनेक तक्रारींचा सामना करावा लागला. आता, शोमधील सरपंच मंजू देवी (नीना गुप्ता), तिचा पती ब्रिजभूषण दुबे (रघुबीर यादव), प्रल्हाद (फैसल मलिक) आणि विकास (चंदन रॉय) यांच्यासोबत गणेशचे समीकरण कसे जुळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


'पंचायत 3' केव्हा होणार स्ट्रीम?


पंचायत वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'पंचायत 3' ही वेब सीरिज या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या सीरिजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला नाही. मात्र, पंचायत मधील संभाव्य ट्विस्टच्या चर्चेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली  आहे.