Paani Marathi Movie :  सिनेइंडस्ट्रीतील तीन दिग्गज प्रोडक्शन हाऊस पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. राजश्री एंटरटेन्मेंट आणि प्रियांका चोप्राची पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आता पदार्पण करत आहे. हा चित्रपट 18 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. 'पाणी'च्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे राजश्री एंटरटेन्मेंट पहिल्यांदाच मराठी चित्रपटाच्या निर्मितीत उतरले आहे. 


या चित्रपटाबद्दल पर्पल पेबल पिक्चर्सची संस्थापक आणि प्रवर्तक प्रियांका चोप्रा जोन्सने सांगितले की, 'पाणी’ हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी घेऊन येताना खूप आनंद होतोय. या चित्रपटातून अतिशय महत्वाचा मुद्दा हाताळणार आहोत. हा चित्रपट खूप खास आहे. निर्मितीसाठी आव्हानात्मक असला तरी आपण ज्या काळात राहात आहोत, त्या काळासाठी तो खूप प्रासंगिक आहे. हा एका अशा माणसाचा प्रवास आहे, ज्याने आपल्या आजुबाजुच्या सर्वांच्याच जीवनात आमुलाग्र बदल घडवला. हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे प्रियांकाने सांगितले. आदिनाथचे दिग्दर्शन विशेष उल्लेखनीय असून या संपूर्ण टीमचे, त्यांच्या मेहनतीचे मनापासून आभार मानत असल्याचे प्रियांकाने सांगितले. माझा चौथा मराठी चित्रपट मी राजश्री एंटरटेनमेंट आणि कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासारख्या दोन नावाजलेल्या प्रोडक्शन हाऊससोबत घेऊन येत असल्याचा आनंद वाटत असल्याचे प्रियांकाने सांगितले.






राजश्री एंटरटेन्मेंटच्या नेहा बडजात्या  यांनी म्हटले की, ''राजश्री एंटरटेन्मेटचा हा पहिला मराठी चित्रपट आहे आणि ‘पाणी’सारखा चित्रपट घेऊन तगड्या टीमसह आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, याचा आनंद खूप जास्त आहे. हा चित्रपट पाणीटंचाईच्या महत्त्वाच्या समस्येवर भाष्य करणारा आहे.'पाणी' सारख्या सामाजिक मुद्द्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यात हा चित्रपट महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा आम्हाला विश्वास आहे, असे नेहा बडजात्या यांनी म्हटले. 


दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी सांगितले की, '' प्रियांका चोप्रा जोन, राजश्री एंटरटेन्मेंट यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे माझ्यासाठी एक मोठी संधी होती. माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाच्या चित्रपटाला अशी टीम लाभणे, हे मी माझे भाग्य समजतो असे त्याने म्हटले.  'पाणी' या चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असे आदिनाथ कोठारेने म्हटले. 


चित्रपटात तगडी स्टारकास्ट 


नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची कथा असणाऱ्या 'पाणी'मध्ये आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर,  नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.