मुंबई : अणुबाँबचा शोध लावणाऱ्या जे रॉबर्ट ओपनहामयरवर (Oppenheimer) चित्रपट येत असून त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. युनिव्हर्सल पिक्चर्सने त्याचा पहिला टीझर प्रकाशित असून त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट 2023 साली प्रदर्शित होणार आहे. 


अणुबाँबच्या शोधाने अवघ्या जगाला बदलवून टाकणाऱ्या जे रॉबर्ट ओपनहायमर या व्यक्तीवर ख्रिस्तोफर नोलन चित्रपट तयार करत असल्याने त्याची उत्सुकता चित्रपट प्रेमींना आहे. ख्रिस्तोफर नोलन हा हॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक असून त्याचे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक प्रकारची पर्वणीच असते. नोलन यांच्या कल्पना अशा काही भव्य दिव्य असतात की त्यामुळे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतात. आताही ते अशाच ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ओपनहायमर या चित्रपटामध्ये जे रॉबर्ट ओपनहायमर यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता सिलियन मर्फी करत आहेत. हा चित्रपट 21 जुलै 2023 साली प्रदर्शित होत आहे.


 






कोण आहेत जे रॉबर्ट ओपनहायमर?
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लागलेल्या अणुबाँबच्या शोधाने अवघ्या जगाला बदलवून टाकलं. अमेरिकेने त्याचा वापर करत जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांना बेचिराख केलं. आजही जगावर अणुबाँबचे संकट कायम असून जग त्याच्या भीतीच्या छायेखाली वावरतंय. त्याच अणुबाँबचा शोध जे रॉबर्ट ओपनहायमर यांनी लावला.


भगवद् गीतेचा अभ्यासक
अणुबाँबचा जनक समजल्या जाणाऱ्या ओपनहायमरने भगवद् गीतेचा अभ्यास केला होता. 16 जुलै 1945 साली मेक्सिकोच्या ट्रिनीटी केंद्रावर अणुबाँबची चाचणी करण्यात आली होती त्यावेळी त्याने भगवद् गीतेतील श्लोकांचा आधार घेत त्याचं समर्थन केलं होतं. 


'श्री भगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः। ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः।।'


'या विश्वाचा नाश करणारा मी काल आहे, आता मी अधर्माचा विनाश करण्यासाठी आलो आहे.'


ख्रिस्तोफर नोलन हे 21 व्या शतकातील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहेत. द डार्क ट्रायालॉजी, इन्सेप्शन, इंटरस्टेलर सारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन ख्रिस्तोफर नोलन यांनी केलं आहे. आता 'ओपनहायमर'च्या माध्यमातून ते आणखी एका भव्य चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.