BLOG : मृत्यू कोरोनाने की भीतीने?

डॉ शिवरत्न शेटे Updated at: 30 Apr 2021 06:05 PM (IST)

Blog By Shivratna Shete

    अनेक जण शुद्ध आयुर्वेदाच्या मदतीने कोरोनामुक्त झाले आहेत, तर अनेकजण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर किंवा होम क्वॉरंटाईन झाल्यावर. पूर्वीची अॅलोपॅथी औषधी सुरू ठेवून दोन तासांच्या अंतराने आयुर्वेद घेत आहेत. कित्येक ठिकाणी आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना लाखो रुपयांची इंजेक्शन्स देऊनही ऑक्सिजन पातळी कमी होऊन रुग्णांची प्रकृती खालावतेय. तेव्हा अखेरचा प्रयत्न म्हणून नातेवाईक धावपळ करत अनेक शहरात आयुर्वेद तज्ज्ञांकडून प्राणरक्षक औषधी घेत आहेत. प्रसंगी Ryle's Tube (नाकातून पोटात टाकलेली नळी) वापरून औषधी आत सोडत आहेत. याचा अनेक शहरात सकारात्मक परिणाम झालेला दिसतो. 


ऑक्सिजन पातळी झपाट्याने सुधारून कित्येक रुग्णांचे प्राण वाचत आहेत. सोलापूर, बीड, औरंगाबाद,नागपूर ते पुणे मुंबई, अहमदनगरपर्यंत अनेक शहरातील रुग्णांचे हे अनुभव आहेत. गोष्ट साधी आहे, जर भयानक पसरलेली आग (कोरोना) केवळ वाळू, कार्बन डायऑक्साइड (अॅलोपॅथी) ने विझत नसेल तर पाणी (आयुर्वेद) आपण मारतोच ना! म्हणूनच कोरोनावर मात करून पुन्हा उभं राहू! फक्त रुग्णांनी घाबरून जाऊ नये.


भीती :
प्राचीन आयुर्वेद संहितेत आचार्य चक्रदत्त वर्णन करतात,



भीरुतस्यरोगकर्तुत्वात म्हणजे, घाबरणाऱ्या व्यक्तीचा आजार बळावतो किंवा आजाराचे महत्वाचे कारण भीती होय!- आचार्य चक्रदत्त



विषादो रोगवर्धनानाम् विषाद म्हणजे दु:ख आणि दु:खाने रोगप्रतिकारक क्षमता कमी होते- आचार्य चक्रदत्त


आचार्य चरकांनी ,


हीनसत्व (अल्पसत्व) म्हणजे मनाने कमकुवत व्यक्तीचीच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, असे वर्णन केले आहे. मनाचा शरीरावर परिणाम होतो, हे विज्ञानाने सिद्ध केले आहे, त्याला #PsychoSomaticEffect
(सायको-सोमॅटिक )म्हटले आहे. तर हजारो वर्षांपूर्वी हे लिहिलेले आहे. आयुर्वेदात भीतीमुळे निर्माण होणारा भयज अतिसार (जुलाब) वर्णन केलेला आहे. खरं म्हणजे चिंता, भय, शोक, क्रोध, अनिद्रा, या मानसिक भावांचा परिणाम थेट शरीरक्रीयांवर होतो. याचा संबंध हॉर्मोन्सवर होतो. (Pituitary,Insuline,Adrenaline, Serotonin, Dopamine)

Adrenaline हे हॉर्मोन भीतीमुळे वाढते,परिणामी काही क्षणापूर्वी नॉर्मल असणारा व्यक्ती अचानक ढासळतो, धडधड वाढते, डोळ्याच्या बाहुल्यांचा विस्फार, रक्तात साखर वाढणे, घामाघुम होणे, तोंड कोरडं पडणे,
vasoconstriction रक्तवाहिन्यांचा अचानक संकोच होणे, परिणामी रक्तदाब वाढणे अशा अनेक हॉर्मोन्सच्या घडामोडी शरीरांतर्गत घडत असतात.



परिणामी जीवितास धोका उत्पन्न होतो, त्यामुळे कोरोना व्हायरसच्या टॉक्सिनमुळे जेवढे मृत्यू होत आहेत, त्यापेक्षा कदाचित जास्त मृत्यू हे रुग्ण जास्त भयभीत झाल्याने होत आहेत. तेव्हा विनंतीवजा आवाहन आहे की घाबरू नका. त्याचबरोबर रूग्णापर्यंत नकारात्मक बातम्या पोहोचणार नाहीत याची काळजी घ्या. त्याच्या अवतीभवती सकारात्मक वातावरण तयार करा, रुग्ण होम क्वॉरंटाईन राहून उपचार घेत असेल तर त्याला आवडतील अशा पुस्तकांची उपलब्धता करून देणे, संगीत, गाणी ऐकणे, स्टोरीटेलसारखे काही अॅप डाऊनलोड करून वेगवेगळ्या कथा मोबाईलवरून ऐकण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणं हे टेक्नोसॅव्ही पीढीचे काम आहे.


औषधोपचाराच्या सोबतच सकारात्मक मानसिकतेकरिता केल्या जाणाऱ्या सर्व उपाययेजना म्हणजेच आयुर्वेदानुसार,चरक संहितेनुसार अद्रव्यचिकित्सा किंवा सत्वावजय चिकित्सा होय. कित्येक रुग्णांनी या चिकित्सेन्वये 
मी स्वत: फोन लावून अनेकांना धीर दिला. यामुळे रुग्ण संपूर्णपणे सकारात्मक होत आहेत, हा माझा शेकडो रुग्णांबाबतचा अनुभव आहे. "घाबरू नकोस! मी 24 तास तुझ्या सोबत आहे,गरज वाटली तर मला मध्यरात्री सुद्धा फोन करू शकतोस" हा माझा आश्वस्त करणारा आवाज त्याच्या कानावरती जातो ना, तेव्हा तो होम क्वॉरंटाईन असो की आय.सी.यु.मध्ये तो संपूर्णपणे सकारात्मकतेने कोरोनावर मात करून जिद्दीने पुन्हा उभा राहतो. म्हणूनच एवढंच सांगेन की 98% लोक वाचत आहेत, त्यात तुम्ही आहात. 95 वर्षीय वयाच्या व हाय रिस्क स्कोर वाढलेल्या कित्येकांनी  कोरोनावर मात केलीय.



यामुळेच कोरोनाला घाबरू नका हे सातत्याने सर्वांनी लक्षात घ्यावं. मास्क, डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशनसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करणे मात्र गरजेचेच आहे, लोकांनी बेफीकीर वागणे सोडल्यास लवकरच जगावरचे हे संकट दूर होणार आहे. अमेरिकेतील फायझर कंपनीचे संशोधन अंतिम टप्प्यात आलंय, येत्या काही महिन्यात कोरोना विषाणूविरूद्धचे ब्रम्हास्त्र प्रोटीज इनहिबिटिंग  (Protease inhibiting) या तंत्रज्ञानावर आधारित आहे,जे यापूर्वी एड्स विषाणू विरोधात यशस्वी ठरलंय.


थोडक्यात सांगायचं तर जग कोरोनामुक्त होणारच! आणि पुन्हा पहिल्याप्रमाणे तुम्हा आम्हाला मोकळा श्वास घेता येणार.


 

Published at: 30 Apr 2021 06:04 PM (IST)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.