उस्मानाबाद : शिवसेनेचे आमदार, माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केली आहे. महाआघाडीत आपल्या पुतण्याला उपाध्यक्षपद मिळत नसल्याने तानाजी सावंत यांनी भाजपसोबत घरोबा केला आहे. बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनिल देसाई यांनीही फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तानाजी सांवत यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.


तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळालं नाही, म्हणून ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत तानाजी सावंत यांनी आपला पुतण्या धनंजय सावंतला महाविकास आघाडीतून उपाध्यक्ष पद मिळावं यासाठी प्रयत्न केले होते. मात्र महाआघाडीतून आपल्या पुतण्याला उपाध्यक्षपद देत नसल्यामुळे नाराज तानाजी सावंत भाजपसोबत जाणं पसंत आहे.


उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अस्मिता कांबळे आणि उपाध्यक्षपदासाठी धनंजय सावंत हे भाजपचे उमेदवार आहेत. तानाजी सावंत यांच्यामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.. तानाजी सावंत आपल्या सहा सदस्यांसह भाजपच्या गोटात गेल्यामुळे भाजपकडे 32 सदस्य झाले आहेत.