अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरेंमधील समज-गैरसमज दूर झाले आहेत, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश मान्य केला आहे. तुम्हाला त्रास होईल असं कुठलंही कृत्य होणार नाही असा शब्द दोघांनीही मुख्यमंत्र्यांना दिला आहे, असेही शिंदे यांनी सांगितलं. दोघांनीही एकत्र पक्षासाठी काम करण्याचे आश्वासन दिले आहे. हे दोघेही पक्षवाढीसाठी काम करतील, आपली ताकद मोठी आहे आणि आता ही ताकत अजून वाढणार आहे, असेही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा - अब्दुल सत्तार गद्दार, मातोश्रीची पायरी चढू देऊ नका : चंद्रकांत खैरे
आमच्यातील वाद मिटलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर चर्चा झाली. आता आम्ही पक्षशिस्तीनुसार काम करु. आगामी निवडणुकांसाठी हातात हात घेऊन काम करु, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.
तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि माझ्या गैरसमजातून काही गोष्टी झाल्या. मात्र आता पक्षाच्या शिस्तीप्रमाणे आणि पक्षप्रमुखांच्या आदेशानुसारच काम होईल. पक्षाच्या आदेशाचं पालन होईल. आता पुढे कधीही असा वाद होणार नाही, असे मंत्री सत्तार म्हणाले.
काय होता नेमका वाद?
औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. कारण, अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या मीना शेळके (काँग्रेस) विजयी झाल्या आहेत. तर उपाध्यक्षपदाची माळ भाजपच्या एल. जी. गायकवाड यांच्या गळ्यात पडली आहे. उपाध्यक्षपद निवडणुकीत भाजपच्या गायकवाड यांना 32 तर महाविकास आघाडीच्या शुभांकी काजे (शिवसेना) यांना 28 मतं मिळाली. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी विरोधात मतदान केल्यामुळे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या हातून गेलं, असा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता.
अब्दुल सत्तार हे गद्दार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची जहरी टीका | Aurangabad | ABP Majha
चंद्रकांत खैरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली होती. खैरे म्हणाले की, आजच्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला अब्दुल सत्तारांचं मतदान मिळालं नाही. त्यामुळे सत्तारांना आता मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही.
खैरे म्हणाले होते की, अशा गद्दारांना (सत्तार) पक्षात राहण्याचा अधिकार नाही. अब्दुल सत्तार गद्दार आहेत असा एकेरी उल्लेख करत खैरे यांनी सत्तारांवर जोरदार हल्लाबोल केला. खैरे म्हणाले की, सत्तार महायुतीचे मंत्री आहेत, तरीदेखील ते सहा सदस्यांना घेऊन भाजपकडे गेले. त्यांनी भाजपकडे जावं. मंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांची ताकद असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक लढावी आणि निवडून यावं.
खैरे म्हणाले की, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण आजच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाला सत्तारच जबाबदार आहेत. या गद्दाराला पवित्र 'मातोश्री'च्या (शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान) आत प्रवेश देऊ नका, अशी विनंती मी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.