औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला. कारण, अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या मीना शेळके (काँग्रेस) विजयी झाल्या आहेत. तर उपाध्यक्षपदाची माळ भाजपच्या एल. जी. गायकवाड यांच्या गळ्यात पडली आहे. उपाध्यक्षपद निवडणुकीत भाजपच्या गायकवाड यांना 32 तर महाविकास आघाडीच्या शुभांकी काजे (शिवसेना) यांना 28 मतं मिळाली. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी विरोधात मतदान केल्यामुळे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या हातून गेलं, असा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.


चंद्रकांत खैरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खैरे म्हणाले की, आजच्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला अब्दुल सत्तारांचं मतदान मिळालं नाही. त्यामुळे सत्तारांना आता मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही.


शिवसेनेवर नाराज असलेल्या अब्दुल सत्तारांची समजूत काढण्यासाठी चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेचे नेते सत्तारांना भेटले. या भेटीनंतर खैरे म्हणाले की, त्यांनी (सत्तारांनी)मला सांगितलं की, मी उद्धव ठाकरेंसमोर राजीनामा फेकलाय. तरीदेखील मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मी म्हणालो की, मी शिवसेनेचा नेता आहे, म्हणून तुम्हाला समजवायला आलो आहे. परंतु ते ऐकायला तयार नाही.


खैरे म्हणाले की, अशा गद्दारांना (सत्तार) पक्षात राहण्याचा अधिकार नाही. अब्दुल सत्तार गद्दार आहेत असा एकेरी उल्लेख करत खैरे यांनी सत्तारांवर जोरदार हल्लाबोल केला. खैरे म्हणाले की, सत्तार महायुतीचे मंत्री आहेत, तरीदेखील ते सहा सदस्यांना घेऊन भाजपकडे गेले. त्यांनी भाजपकडे जावं. मंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांची ताकद असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक लढावी आणि निवडून यावं.


खैरे म्हणाले की, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण आजच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाला सत्तारच जबाबदार आहेत. या गद्दाराला पवित्र 'मातोश्री'च्या (शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान) आत प्रवेश देऊ नका, अशी विनंती मी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.