NCP Demands Bharat Ratna For Dadasaheb Phalke: भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna Award) देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. यासोबतच पक्षाध्यक्ष अजित पवार यांनाही यासंदर्भात पत्र लिहिण्यात आलं आहे. पद्म पुरस्कारांच्याबाबतीत मराठी माणसांवर सातत्यानं अन्याय होत आल्याची भावना या पत्रात मांडण्यात आली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा अपवाद सोडला तर कलाक्षेत्रातल्या कोणत्याही मराठी माणसाला भारतरत्न मिळाला नसल्याची खंत पत्रात मांडण्यात आली आहे. यासोबतच आतापर्यंत महाराष्ट्राला मिळालेल्या 269 पद्म पुरस्कारामध्ये केवळ 52 मराठी माणसांनाच हा सन्मान मिळाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मोठा इतिहास असलेल्या मराठी चित्रपट सृष्टीतील कोणत्याही कलाकाराला आत्तापर्यंत पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नसल्याची खंत पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. बॉलिवूडच्या उदात्तीकरणात मराठी चित्रपटसृष्टी आणि कलाकारांना डावलण्यात आल्याची भावना पत्रात मांडण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पत्रात पद्म पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटसृष्टी आणि कलाकारांना कसं डावलण्यात आलं, याची अभ्यासपूर्ण आकडेवारी मांडली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला नवी ओळख देण्यात दादासाहेब फाळके यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामूळेच त्यांना 'भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक' म्हटलं जातं. त्यांच्या नावानं केंद्र सरकार चित्रपटसृष्टीत अमुल्य योगदान देणाऱ्या कलाकाराला 'दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारा'नं सन्मानित करतं. भारतीय चित्रपट सृष्टीतला हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. त्यामुळेच दादासाहेब फाळके यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाच्या सांस्कृतिक आणि चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत ही मागणी केली आहे.
दादासाहेब फाळके यांचं भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक कार्य
दादासाहेब फाळके, यांना 'भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक' म्हटलं जातं. हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी भारतीय सिनेमा सुरू करण्यामध्ये मोठा वाटा उचलला. दादासाहेब फाळके यांनी 1913 साली 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाची निर्मिती केली. हा भारतातील पहिला संपूर्ण काल्पनिक मूक चित्रपट होता.चित्रपटासाठी त्यांनी कथा, पटकथा, दिग्दर्शन, छायाचित्रण, संपादन आणि वितरणाची जबाबदारी स्वतः पार पाडली. या चित्रपटामुळे भारतीय सिनेमा सुरू झाला आणि पुढे मोठ्या उद्योगात बदलला.
दादासाहेब फाळके यांनी जॉर्ज मेलिएस यांच्या 'द लाईफ ऑफ क्राईस्ट' या चित्रपटानं प्रेरणा घेतली. त्यांनी भारतीय संस्कृतीवर आधारित कथा दाखवण्याचा निर्धार केला आणि यासाठी कर्ज घेऊन चित्रपट निर्मिती सुरू केली. फाळके यांना सुरुवातीला आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा सामना करावा लागला. महिलांना अभिनय करायला परवानगी नव्हती, म्हणून त्यांना स्त्री पात्रांसाठी पुरुष कलाकार घ्यावे लागले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि फाळके यांच्या प्रयत्नांना यश मिळालं.
'राजा हरिश्चंद्र'नंतर त्यांनी 'मोहिनी भस्मासूर' (1914), 'लंका दहन' (1917), आणि 'कृष्ण जन्म' यांसारखे अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट बनवले. दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेमा एका महत्त्वाच्या पायावर उभा केला. त्यांच्या नावानं 1969 पासून भारत सरकारनं 'दादासाहेब फाळके पुरस्कार' सुरू केला, जो भारतीय सिनेक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. दादासाहेब फाळके हे एक बहुश्रुत व्यक्तिमत्त्व होतं. त्यांना छायाचित्रण, मुद्रण, आणि तांत्रिक ज्ञानात गती होती. त्यांनी आपल्या कल्पनाशक्ती आणि मेहनतीनं भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे.
पद्म पुरस्कारांमध्ये मराठी कलाकार उपेक्षित
या पत्रातून आतापर्यंतच्या पद्म पुरस्कारांत मराठी कलाकारांना डावलण्यात आल्याची मांडणी करतांना आकडेवारीच सादर करण्यात आली आहे. 1954 ते 2024 पर्यंत देशात 50 जणांना 'भारतरत्न पुरस्कार' देण्यात आला आहे. यात चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील 7 जणांना गौरवण्यात आलं. यात मराठी असलेल्या फक्त लता मंगेशकर आणि पंडीत भीमसेन जोशी यांचा समावेश आहे. भारतीय चित्रपट सृष्टीला जन्म देणार्या दादासाहेब फाळके यांना मात्र 'भारतरत्न'नं गौरवण्यात आलेलं नाही.
'पद्म पुरस्कारां'च्या यादीत आजवर सर्वाधिक 269 पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना दिले गेले आहेत. यापैकी मराठी व्यक्ती 52 आहेत. प्रभा अत्रे आणि इतर काही कलाकारांना 'पद्मश्री', 'पद्मविभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रात राहणार्या परंतु मराठी नसलेल्या 216 जणांना पद्म पुरस्कार दिले गेलेले आहेत. ज्या मराठीतेतर व्यक्तींना पुरस्कार दिले गेले, त्यांच्या गुणवत्तेबाबत शंका नसल्याचं पत्रात नमूद करण्यात आले आहे. या व्यक्ती सर्वस्वी पुरस्काराला पात्र आहेतच, परंतु महाराष्ट्राच्या नावावर 269 संख्या दिसत असताना त्यात मराठी व्यक्ती केवळ 52 असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. हेच तामिळनाडूत तब्बल 147 पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. त्यात अन्य भाषिक कुणीही नाही. कर्नाटकातील 43 जणांना, आंध्र आणि तेलंगणाच्या 59 जणांना, केरळच्या 51 जणांना पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. या राज्यांचा आकार पाहता त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या अधिक दिसते. पश्चिम बंगाल व केरळमधील अनुक्रमे 70 आणि 51 पद्म पुरस्कारार्थी आहेत. या राज्यातील कलाकारांचा एकूण सांस्कृतिक पर्यावरणावर असलेल्या वर्चस्वाची साक्ष यातून पटते. महाराष्ट्रासाठी पद्म पुरस्कारांचा विचार करताना बॉलिवूड, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यक्ती आणि मराठी माणसांचा स्वतंत्रपणे विचार केला जावा अशी अपेक्षा पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. पद्म पुरस्कार येत्या काही दिवसांत जाहीर होतील, यावेळी खालील वास्तवाचा जरूर विचार करावा अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.
बॉलिवूडला झुकतं माप देतांना मराठी प्रतिभेवर अन्याय करू नका : बाबासाहेब पाटील
यासंदर्भात 'एबीपी माझा'शी बोलताना बाबासाहेब पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "गेल्या 75 वर्षांत कलाक्षेत्रातील 269 पद्म पुरस्कारार्थी महाराष्ट्रातील असल्याचा आनंद आहे. पण यात केवळ 52 मराठी कलाकारांचा समावेश असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून दिसून येते. सर्वोच्च भारतीय सन्मान असणाऱ्या 50 भारतरत्नांतही फक्त एक मराठी कलाकार अर्थात गानसम्राज्ञी लतादीदींचे नाव आहे. आणि भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा सर्वोच्च पुरस्कारासाठी अद्याप विचारही झालेला नाही, हे पाहून महाराष्ट्रात असल्याची खंत वाटते. बॉलीवूडमधील कलाकारांचा आदर असला तरी केवळ महाराष्ट्र ही कर्मभूमी असलेल्या अमराठी कलाकारांना पुरस्कारांत झुकते माप दिले जाते हा मराठी कलाकारांच्या प्रतिभेचा अनादर आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! रवींद्र नाट्य मंदिरात फेब्रुवारी अखेरीस तिसरी घंटा