Mumbai Crime News : मराठी दिग्दर्शिकेच्या घरात मोठा डल्ला मारण्यासाठी आलेल्या चोराला बोक्यामुळे पळ काढावा लागल्याची घटना समोर आली आहे. पळ काढण्याआधी चोराने घरातील काही रोख रक्कम, वस्तूंसह पोबारा केला आहे. 'मितवा', 'फुगे', 'लाल इश्क', 'सविता दामोदर परांजपे' आदी मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी (Swapna Waghmare Joshi) यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोराने पाइपवरून सहाव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये शिरकाव केला. चोराची ही कृती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी मुंबईतील अंधेरीमधील सब टीव्हीच्या गल्लीत शबरी रेस्टॉरंटच्या शेजारी असलेल्या विंडसर बी सोसायटीमध्ये राहतात. या सोसायटीत सहाव्या मजल्यावर स्वप्ना यांचा फ्लॅट आहे. चोराने स्वप्ना यांच्या घरात 24 ऑगस्टच्या पहाटेच्या पूर्वी त्यांच्या घरात शिरकाव केला. घरातील वस्तूंवर डल्ला मारण्याचे काम सुरू असताना घरातील बोक्याने चोराला पळ काढण्यास भाग पाडले.
एका वृत्तपत्रासोबत बोलताना स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी सांगितले की, 24 ऑगस्ट रोजी रात्री 3 वाजून 17 मिनिटांनी सहाव्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटमध्ये चोराने घुसखोरी केली. चोराने हॉलच्या खिडकीची काच सरकवून घरात प्रवेश केला. माझी आई आजारी असल्याने घरी सीसीटीव्ही लावल्याने आणि बोक्याच्या दक्षतेमुळे चोरीचा प्रकार उघड झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आंबोली पोलिसांनी चोराला अटक केली आहे.
असा उधळला गेला मोठ्या चोरीचा डाव
दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी सांगितले की, चोराने मुलीच्या पर्समधील सात हजार रुपये चोरले. चोराने घरात शिरल्यानंतर किचनमध्ये गेला. देवाच्या खोलीतही गेला पण त्या ठिकाणाहून काहीही चोरले नाही. त्याला पुन्हा पाइपवरूनच खाली उतरायचे होते. त्यामुळे कदाचित त्याने जड वस्तू उचलली नसावी, रोख रक्कमेच्या शोधात चोर असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. चोराने आईच्या खोलीत डोकावला. त्यावेळी रुममध्ये केअर टेकर खाली झोपली होती. झोपेत तिची हालचाल झाल्याने चोराने लगेच दरवाजा बंद केला.
आईच्या रुमनंतर चोराने माझ्या मुलीच्या रुममध्ये गेला. सुदैवाने माझा होणारा जावई त्यावेळी आमच्या घरीच होता. आम्ही सर्व झोपेत असल्याने काही समजले नाही. आमच्या घरी एक मांजर आणि बोका आहे, पण मुलीने एका बोक्याला घरी आणले आहे. त्या बोक्याने चोराला पाहिले आणि तो माझ्या जावयाच्या पोटावर जाऊन उड्या मारू लागला. त्यामुळे त्याची झोपमोड झाली आणि चोराला पाहून तो ओरडल्याने चोराने पळ काढला असल्याचे स्वप्ना जोशी यांनी सांगितले. चोराला पकडण्यासाठी जावयाने त्याचा पाठलाग केला. पण, तो वेगाने सहाव्या मजल्यावरून खाली उतरला, असल्याचे स्वप्ना यांनी सांगितले.
सोसायटीमध्ये 42 सीसीटीव्ही कॅमेरे
दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी राहत असलेल्या सोसायटीमध्ये 42 कॅमेरे आहेत. त्याशिवाय सुरक्षा रक्षकही आहेत. तरीही चोराने सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधील प्रवेश कसा केला, याचा तपास सुरू असल्याची माहिती आहे. घरातील चोरीच्या प्रकरणी दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.