Rocky Aur Rani Ki Prem Kahani Review : करण जोहर (Karan Johar) हा बॉलिवूडचा एक लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रेक्षकांना काय हवं हे करणला ठाऊक आहे. त्यामुळे चाहत्यांच्याही त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात. करणचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा बहुचर्चित सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत आहेत.


'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं कथानक काय आहे? (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Story)


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हे सिनेमाचं नाव आहे. पण रॉकी आणि राणीची प्रेमकहाणी ही मध्यांतरानंतर सुरू होते. रणवीर सिंह म्हणजेच रॉकी हा दिल्लीतील एका श्रीमंत घराण्यातील मुलगा आहे. तर दुसरीकडे आलिया भट्ट म्हणजेच राणी ही वृत्तनिवेदिका असून बंगाली कुटुंबातील आहे. रॉकी आणि राणी दोघांची संस्कृती वेगवेगळी आहे. 


रॉकी आणि राणी काही कारणाने एकमेकांना भेटतात. पुढे त्यांची चांगली मैत्री होते आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांचं घराणं वेगळं असल्यामुळे ते तीन महिने एकमेकांच्या घरी राहून एकमेकांबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आता ते एकमेकांच्या कुटुंबाची मने जिंकू शकतात का? हीच कथा उत्तरार्धात दाखवण्यात आली आहे. पूर्वार्धात रणवीरचे आजोबा धर्मेंद्र आणि आलियाची आजी शबाना आझमी यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. ज्यामुळे रॉकी आणि राणी यांची भेट होते.


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा कसा आहे? 


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाची गणना करण जोहरच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये करता येणार नाही. पण हा सिनेमा नक्कीच मनोरंजक आहे. करणच्या बॅनरअंतर्गत हा सिनेमा असल्यामुळे प्रेक्षकांच्या सिनेमाबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पण या सिनेमाने त्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. मुख्य कथा पूर्वार्धात सुरू होत नाही आणि हा सिनेमाचा मायनस पॉइंट आहे. रणवीर सिंह मधेच मनोरंजन करतो. काही संवाद चांगले आहेत तर काही बालिश आहेत, जे ऐकून ते कोणी लिहिले आहेत असे वाटते.


मध्यंतरानंतर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा भावनिक वळण घेतो. या सिनेमात विविध विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. सिनेमा तब्बल साडेतीन तासांचा असल्यामुळे कुठेतरी कंटाळवाणा वाटतो. सिनेमा छोटा असायला हवा होता असं वारंवार वाटत राहतं. रॉकी आणि राणीची कथा पूर्वार्धातच पुढे न्यायला हवी होती. सिनेमातील गाणी चांगली आहेत. पण करण जोहरने या सिनेमावर आणखी काम करायला हवंह होतं. 


अभिनय...


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात रणवीर सिंह प्रेक्षकांना हसवण्यासोबत रडवतोदेखील. पण सिनेमा पाहताना रॉकी ऐवजी रणवीरचं दिसतो. आलिया भट्टचा अभिनय चांगला आहे. पण तिने यापेक्षा आणखी चांगलं काम करायला हवं होतं. जया बच्चन या सिनेमात रणवीरच्या आजीच्या भूमिकेत आहे. ती कुटुंबाची प्रमुख आहे. धर्मेंद्रनेही चांगलं काम केलं आहे. शबाना आझमीने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. पण त्यांच्या जागी दुसरं कोणाला विचारायला हवं होतं असं वाटतं. 


करण जोहरचं दिग्दर्शक कसं आहे? 


करण जोहरचं दिग्दर्शन ठिक आहे. पटकथेवर जास्त मेहनत घ्यायला हवी होती. सिनेमा आणखी लहान करायला हवा होता. सिनेमातील काही दृश्यांचा विचार करायला हवा होता. सिनेमा आणखी लाजवाब करण्यासाठी थोडे कष्ट घ्यायला हवे होते.