नवी दिल्ली : भारत सरकारच्यावतीनं दिला जाणारा 2023 साठीचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित मल्याळम सिनेसृष्टीतील अभिनेते , निर्माते, दिग्दर्शक मोहनलाल यांना जाहीर झाला आहे.  मिथुन चक्रवर्ती,शंकर महादेवन, आशुतोष गोवारीकर या तिघांच्या दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीनं मोहनलाल यांच्या नावाची शिफारस केली. त्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला. 

Continues below advertisement


भारत सरकारने आज दिग्गज अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता मोहनलाल यांना 2023 या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. 23 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.  


मोहनलाल यांच्या भारतीय चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार घोषित करताना आनंद वाटत असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं. मोहनलाल यांचा चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांची अतुलनीय प्रतिभा, अष्टपैलुत्व आणि अथक परिश्रम यांनी भारतीय चित्रपट इतिहासात एक सुवर्ण मापदंड प्रस्थापित केला आहे, असं अश्विनी वैष्णव म्हणाले.


मोहनलाल यांची कारकीर्द (Mohanlal Career)


मोहनलाल विश्वनाथन नायर ख्यातनाम अभिनेते, निर्माते आणि पार्श्वगायक आहेत. ते मल्याळम चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. "परिपूर्ण अभिनेते " म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहनलाल यांनी पाच दशकांच्या कारकिर्दीत 360 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. किरीदम, भरतम, वानप्रस्थम, दृश्यम आणि इतर चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत.


मोहनलाल यांनी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक केरळ राज्य चित्रपट पुरस्कारांसह भारत आणि परदेशात अनेक सन्मान मिळवले आहेत. 1999 साली प्रदर्शित झालेला त्यांचा 'वानप्रस्थम' हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.


मोहनलाल यांना 2009 साली  भारतीय टेरिटोरियल आर्मीमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्त करण्यात आले. भारत सरकारने त्यांना 2001 साली पद्मश्री आणि 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.   


दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Falke Award)


दादासाहेब फाळके यांनी 1913 साली ‘राजा हरिश्चंद्र’ या भारतातील पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला. 1969 मध्ये देविका राणी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित होणारे हे चित्रकर्मी, भारतीय सिनेमाची निर्मिती आणि विकासात त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानासाठी ओळखले जातात. सुवर्णकमळ पदक, शाल आणि 10 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.