Mohammed Rafi Birth Anniversary : मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील कोटला सुल्तान सिंह गावात झाला. एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या या अवलियाने पुढे जाऊन भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या सुरेल आवाजाने साऱ्यांनाच मोहात पाडले. लाहोरमध्ये उस्ताद वाहिद खान यांच्याकडून रफींनी संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर गुलाम अली खान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. वयाच्या 13 व्या वर्षी रफींनी पहिल्यांदा जाहीर व्यासपीठावर गाणं गायलं आणि यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या संगीतकार श्याम सुंदर यांना त्यांचं गाणं आवडलं. श्याम सुंदर यांनी रफींना मुंबईत बोलावलं. त्यानंतर 'सोनिये नी हिरीये नी' हे पहिलं गाणं रफींनी 'गुल बलोच' या पंजाबी सिनेमासाठी गायलं. 1944 साली नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 'हिन्दुस्तान के हम है पहले आप के लिए गाया' हे पहिलं हिंदी गाणं गायलं आणि नंतर असंख्य गाण्यांमधून आपल्या आवाजातली जादू त्यांनी दाखवून दिली.


घरात तशी संगीताची आवड नव्हती, परंतु मुलाचा संगीताकडे कल बघून, वडिलांनी किराणा घराण्याच्या वहीद खान, फिरोझ निझामी यांच्याकडे धाडला आणि त्यांच्याकडून महंमद रफींना संगीताची थोडीफार तालीम मिळाली. वरील दोन गुरूंपैकी, फिरोझ निझामी यांनी काही हिंदी चित्रपटांना - जुगनू सारख्या त्याकाळी लोकप्रिय झालेल्या चित्रपटाला संगीत देखील दिले होते आणि रफींची पुढील कारकीर्द बघता, या योगायोग अन्वर्थक ठरतो.सैगल हे त्यांचे आदर्श गायक होते आणि त्याकाळचा सैगल यांचा प्रभाव बघता, ते सुसंगतच होते.


प्रसिद्ध संगीतकार श्यामसुंदर यांनी रफींना 1944 मध्ये आलेल्या "गुल बलोच" या चित्रपटात गायनाची संधी दिली. पुढे "गांव की छोरी आणि "बझार" सारख्या चित्रपटात श्यामसुंदर यांनी आणखी संधी देऊन, चित्रपट सृष्टीत पाय रोवायला मदत केली. परंतु खऱ्या अर्थाने, प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल-भगतराम या जोडगोळीने "मीना बझार" या चित्रपटातील 12 गाण्यांपैकी 10 गाणी गावयास दिली आणि रफी प्रकाशात आले. हे सगळे लिहिण्याचा उद्देश असा, त्यावेळी निरनिराळ्या प्रकृतीच्या रचनाकारांनी रफींना पसंती दिली होती.


रफींच्या अष्टपैलू गायनाला  पुढेही वारंवार दाद मिळत गेली, त्याची ही नांदी असे सहजपणे म्हणता येईल. इथे एक बाब ध्यानात ठेवणे अत्यावश्यक ठरेल, हा सगळा काळ, नायक-गायकांचा होता आणि अर्थातच अशा वेळेस, केवळ गायक म्हणून स्थिरावण्यासाठी बरीच धडपड करणे क्रमप्राप्तच होते. चित्रपट संगीतात "साकार" सादर करण्याचा पार्श्वगायन हा प्रमुख मार्ग म्हणून निश्चित होईपर्यंत असेच चाललेले असे.


हिंदी सिनेसृष्टीतील गायकांपैकी सर्वश्रेष्ठ गायकांच्या यादीत मोहम्मद रफींचं नाव घेतलं जातं. संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला. या पुरस्कारांपेक्षा त्यांना अपेक्षित असलेला रसिकवर्ग त्यांना मोठ्या संख्येने लाभला. 31 जुलै 1980 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आवाजाच्या जादूगाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र आवाजाच्या रुपातून रफी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.