Marathi Movie Sharad Ponkshe:  बॉलिवूड प्रमाणे मराठी सिनेसृष्टीतही अभिनेत्यांच्या मुलांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. तर काही जण हे पडद्यामागे निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आता या यादीत आणखी एका कलाकाराचे नाव जोडले जाणार आहे. अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe)  यांचा मुलगा स्नेह पोंक्षे (Sneh Ponkshe)  आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. शरद पोंक्षे आणि स्नेह पोंक्षे ही वडील-मुलाची जोडगोळी 'बंजारा' या चित्रपटात एकत्र आली आहे.  या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच लाँच करण्यात आला. आयुष्याच्या प्रवासावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचा अंदाज फर्स्ट लूकवरून दिसून येत आहे. 


मराठी कलाक्षेत्रातील शरद पोंक्षे हे महत्त्वाचे नाव आहे. नाटक, मालिका, चित्रपट या कलेच्या विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर शरद पोंक्षे 'बंजारा'चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे करणार आहे. दिग्दर्शक म्हणून स्नेहचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट आणि मनोरंजनात्मक कलाकृती पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. 






अभिनेते-निर्माते शरद पोंक्षे यांनी सांगितले की, ''लेकाच्या चित्रपटाच्या माध्यमातून मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. यापेक्षा वेगळा आनंद काही असूच शकत नाही. स्नेहच्या मनात 'बंजारा'चा विचार आल्यापासून ते चित्रीकरणापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. विषय वेगळा आहे. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट असल्याचेही त्यांनी सांगितले. खरंतर आयुष्यात प्रत्येक मनुष्य हा 'बंजारा' असतोच. चित्रपट पाहाताना याचा अनुभव येईलच असेही पोंक्षे यांनी सांगितले. 
  
दिग्दर्शनात पदार्पण करणारा स्नेह पोंक्षेने सांगितले की, " वडिलांसोबत प्रथमच काम करत आहे. त्यांच्या अनुभवाची मला खूपच मदत झाली. कुठे जायचंय, यापेक्षा तिथे जायचा प्रवास आनंददायी हवा, परंतु याच आनंदाला आपण बऱ्याचदा मुकतो. याचे महत्व अधोरेखित करणारा 'बंजारा'चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल असा विश्वासही स्नेह पोंक्षेने व्यक्त केला. 


चित्रपटाचे नाव जरी जाहीर झाले असले तरी या चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मोरया प्रॉडक्शन्स आणि व्ही.एस.प्रॉडक्शन्स सादर करीत असलेल्या या चित्रपटाचे  शरद पोंक्षे आणि रोहिणी विजयसिंह राजे पटवर्धन निर्माते आहेत. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे सिक्कीममध्ये झाले आहे.