IND vs ENG Semi Final 2024 T20 World Cup : मागील 8 वर्षांपासून टी20 विश्वचषकात विराट कोहलीच्या नावावर आगळावेगळा विक्रम आहे. फलंदाज म्हणून नाही तर गोलंदाज म्हणून विराट कोहलीने पराक्रम केलेला आहे. होय मागील आठ वर्षांमध्ये नॉकआऊट सामन्यात विराट कोहलीनंतर कोणत्याही भारतीय गोलंदाजाला विकेट घेता आलेली नाही. 2016 मध्ये विराट कोहलीने भारतासाठी टी20 विश्वचषकात नॉकआऊट सामन्यात अखेरची विकेट घेतली होती. आज हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. 


भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. टी-२० विश्वचषकातील नॉकआऊट सामन्यात भारतीय संघाची कामगिरी तितकी चांगली राहिलेली नाही.  2024 टी20 विश्वचषकाआधी टीम इंडिया 4 वेळा उपांत्य सामन्यात पोहचली आहे. त्यापैकी दोन वेळाच विजय मिळवता आला आहे. याच उपांत्य सामन्यात विराट कोहलीने भारतासाठी अखेरची विकेट घेतली आहे. टी20 विश्वचषकात नॉकआऊट सामन्यात भारताकडून विकेट घेणारा विराट कोहली अखेरचा गोलंदाज ठरलाय. विराट कोहलीने आठ वर्षांपूर्वी उपांत्य सामन्यात विकेट घेतली होती. 


2016 विराट कोहलीने केला होता पराक्रम -


2016 टी20 विश्वचषकात टीम इंडियाने उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजने सात विकेट्स शिल्लक ठेवत हे आव्हान पार केले होते. या सामन्यात विडिंजी तिसरी विकेट जॉन्सन चार्ल्सची होती, तो कोहलीच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. चार्ल्सने त्या सामन्यात 36 चेंडूत 52 धावा केल्या होत्या. विराट कोहलीला मोठा फटका मारण्याच्या नादात चार्ल्सने रोहित शर्माकडे दिला होता.  त्यानंतर T20 विश्वचषकातील एकाही नॉकआऊट सामन्यात भारतीय गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. 


2021 च्या टी20 विश्वचषकात टीम इंडियाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.  2022 च्या विश्वचषकात भारताने उपांत्य फेरी गाठली होती. पण इंग्लंडने एकाकी विजय मिळवला होता.  इंग्लंडने भारताचा दहा विकेटने पराभव केला होता. आता 2024 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पुन्हा एकदा इंग्लंडशी सामना होणार आहे. आता आठ वर्षानंतर भारतीय गोलंदाज उपांत्य सामन्यात विकेट घेण्यात यशस्वी ठरतात का? की विराट कोहलीचा रेकॉर्ड कायम राहतो, याचं उत्तर गुरुवारी संध्याकाळीच मिळेल.