Actor Shreyas Raje On Ganeshotsav 2025: देशभरात सगळीकडे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अशातच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2025) पार्श्वभूमीवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) अथर्व सुदामेनं (Atharva Sudame) हिंदू-मुस्लिम धर्माचं ऐक्य सांगणारा एक व्हिडीओ शेअर केलेला. त्या व्हिडीओवरुन मोठा गदारोळ झालेला आणि याप्रकरणी अथर्वनं माघार घेऊन व्हिडीओ डिलीट केलेला. पण, आता एका मराठमोळ्या अभिनेत्यानं समाजाला आरसा दाखवणारी पोस्ट लिहिली आहे. तसेच, त्यासोबतच त्याला आलेला अनुभवही सांगितला आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस राजे (Marathi Actor Shreyas Raje) यानं आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्यानं गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची मूर्ती घरी घेऊन येतानाचा एक प्रसंग सांगितला आहे. त्यासोबतच अभिनेत्यानं डोळ्यांत अंजन घालणाऱ्या काही ओळी लिहिल्या आहेत. अभिनेता म्हणाला की, हे जग तिरस्कार आणि भेदभावाने तुडुंब भरलेलं असलं तरी आपण आपला विवेकाचा विचार जागृत ठेवून 'प्रेम' पसरवण्याचाच प्रयत्न करत राहूया नाही का?
अभिनेता श्रेयस राजे नेमकं काय म्हणाला?
श्रेयस राजे म्हणाला की, "मी दैवावर विश्वास ठेवणारा नसलो तरी गणेशोत्सव आवडीने साजरा करतो. कारण ह्या सणाची उर्जा मन प्रफुल्लीत करत असते. असाच एक ताजा अनुभव. माझ्या घरच्या गणपतीची यावर्षीची मूर्ती आणताना एक गाडी बुक केली होती. गाडीच्या चालकाचं नाव 'शोएब' होतं. आम्ही जेव्हा जेव्हा गणपती बाप्पा असं म्हणत होतो तेव्हा तेव्हा तो कौतुकाने आणि आनंदने 'मोरया' म्हणत होता. आणि हो त्या एकूण प्रवासातला ह्या सणाबद्दलचा त्याच्या डोळ्यातला मी पाहिलेला आदर खऱ्याहून खरा होता..."
"सगळं छान आहे!! हे जग तिरस्कार आणि भेदभावाने तुडुंब भरलेलं असलं तरी आपण आपला विवेकाचा विचार जागृत ठेवून 'प्रेम' पसरवण्याचाच प्रयत्न करत राहूया नाही का? गणपती बाप्पा मोरया!!", असं श्रेयस राजे म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :