Man Zal Bajind : टीव्ही मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीवरील ‘मन झालं बाजिंद’ (Man Zal Bajind) या लोकप्रिय मालिकेत सातारा-वाई या भागातील प्रसिद्ध बगाड यात्रा दाखवण्यात येणार आहे. वाई येथील फुलेनगर-शहाबाग येथील अनेक वर्षांची परंपरा असलेले ‘बगाड’ (Bagad Yatra) या मालिकेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. 'मन झालं बाजिंद'च्या कलाकारांनी बावधनसारखेच बगाड फुलेनगर वाई येथे ही होते, हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे कार्य अगदी उत्तम रित्या पार पाडले आणि याची प्रचिती प्रेक्षकांना लवकरच होणार आहे.
‘मन झालं बाजिंद’ ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे आणि प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत पाहिलं की, कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी तिला घटस्फोट द्यायचा निर्णय रायाने घेतला. त्याच दरम्यान गावाची बगाड यात्रा जवळ आली आहे, हे रायाला समजते आणि तो ठरवतो की, देवीला नवस करायचा आणि बगाड घ्यायचे. पण, ज्या लोकांचा नवस पूर्ण होतो त्यांनाच बगाडाचा मान मिळत असतो. या मुद्द्यावर गावकरी त्याला विरोध करतात.
कृष्णाचा मृत्यू टाळू शकेल का राया?
पण, या विरोधाला न जुमानता तो कौल लावतो आणि यंदाचा बगाड्याचा मान रायभान विधाते अर्थात राया यालाच मिळतो. याच दरम्यान कृष्णाची जन्मपत्रिका रायला सापडते, तो ती गुरुजींना दाखवतो आणि गुरुजी सांगतात की, येत्या 7 दिवसांत तिचा मृत्यूयोग आहे. त्यावर राया त्यांना सांगतो, मी माझ्या कृष्णाचा मृत्यू टाळेन आणि तो बगाड्या म्हणून उभा राहतो. रायाची भक्ती वाचवू शकेल का कृष्णाचे प्राण?, हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
बगाड यात्रेच्या विशेष प्रसंगाबद्दल बोलताना राया म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण म्हणाला की, ‘आम्ही वाईमधील फुलेनगर-शहाबाग येथे हा प्रसंग चित्रित केला. हा प्रसंग चित्रित करणं सोपं नव्हतं, पण या गावातील रहिवाशांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. 'बगाडं'म्हणजे काय आणि त्यासाठी लागणारी मेहनत काय असते? हे सगळं आम्हाला इथल्या स्थानिकांनी सांगितलं. त्यामुळे आम्हाला देखील या परंपरेची ओळख झाली आणि आता प्रेक्षकांना सुद्धा ही बगाड यात्रा पाहायला मिळेल आणि मालिकेचे हे आगामी भाग प्रेक्षकांना खूप आवडतील याची आम्हाला खात्री आहे.’
हेही वाचा :
- Pandit Bhimsen Joshi Award : ‘पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार 2022’, ज्येष्ठ तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांना जाहीर!
- Ideas Of India : स्वप्नामागे जर संकल्प असेल आणि त्यामागे आपण जाऊ, तर काहीही शक्य आहे : कैलाश सत्यार्थी
- The Kapil Sharma Show : काय म्हणता, ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा बंद होणार? जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha