Coldplay : कोल्डप्ले (Coldplay) या ब्रिटीश पॉप-रॉक बँडमुळे राज्यातलं वातावरण मात्र चांगलंच हॉट झालंय. त्याचं कारण म्हणजे त्याच्या तिकीट विक्रीवरून झालेले घोटाळ्याचे आरोप. त्यात आता आणखी एका ड्राम्याची भर पडली आहे. हा जगविख्यात बँड 18, 19 आणि 21 जानेवारी 2025 ला नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम मध्ये परफॉर्म करणार आहे. बुक माय शो (BookMyShow) या साईटवरून त्याची तिकीटविक्री सुरू झाली, मात्र याच तिकीट विक्रीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय.
याच प्रकरणी बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजानी यांना आर्थिक गुन्हे शाखेनं दोनदा समन्स बजावलंय.पण चौकशीला हजर राहायचं सोडून आशिष हेमराजानी हे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचलेले दिसले आणि त्याचवेळी फडणवीसांनी मात्र त्यांना भेटण्यासाठी सपशेल नकार दिला.
सीईओंचा सागर बंगल्यावरुन काढता पाय
हे सगळं घडत असताना हेमराजानी एबीपी माझाच्या कॅमेऱ्यातून मात्र सुटू शकले नाहीत. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाल्यावर आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला मात्र त्यांनी माझाचाच कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न करत तिथून काढता पाय घेतला.
कोल्डप्लेवरुन वातावरण का तापलं
जवळपास एक कोटी तीस लाख फॅन्स अजूनही कोल्डप्लेच्या तिकीटाच्या प्रतीक्षेत आहेत. विक्री झालेली तिकिटं काळ्या बाजारात दोन ते तीन लाख रुपये दराने विकली जात असल्याचा आरोप बुक माय शोवर करण्यात आलाय. तर शिवसेना ठाकरे गटानं बुक माय शो हा बुक बाय बीजेपी शो आहे अशी टीका केलीय.
कोल्डप्ले आहे तरी काय?
कोल्डप्ले हा एक ब्रिटिश बॉय बँड आहे. लंडनमध्ये या बँडची स्थापना 1997 मध्ये झाली. कोल्डप्लेने जगभरात 100 दशलक्षहून अधिक अल्बम विकलेत. बँड त्याच्या नफ्यापैकी 10% धर्मादाय आणि विविध मानवतावादी संस्थांना दान करतो. सात ग्रॅमी पुरस्कार आणि नऊ ब्रिट पुरस्कार जिंकले या बँडने आतापर्यंत जिंकले आहेत. ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म केल्यानंतर 2016 नंतर भारतात लोकप्रिय झाला.
कर नाही तर डर कशाला अशी म्हण आहे.जर बुक माय शोनं तिकिटांचा काळाबाजार केला नसेल तर सीईओ आशिष हेमराजानी पोलीस चौकशी का टाळताहेत? आणि ते नेत्यांच्या बंगल्यांचे उंबरठे का झिजवताहेत? या प्रश्नांची ठोस उत्तर मिळत नाही तो पर्यंत संशयाचं वलय गडदच राहणार आहे.