Madhuri Pawar : आपल्या दिलखेचक अदांनी महाराष्ट्राला वेडं लावणारी महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) 'या बया दाजी आलं' म्हणतं तमाम दाजींना घायाळ करायला सज्ज झाली आहे. भलरी प्रॉडक्शन्स निर्मित, राज फिल्म्स प्रस्तुत आगामी बहुचर्चित ‘इर्सल’ (Irsal) या मराठी चित्रपटात माधुरी पवारची ही नखरेल अदाकारी बघायला मिळणार आहे. 'राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!' अशी टॅगलाईन असलेल्या 'इर्सल' चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार यांनी केले आहे.


'इर्सल' चित्रपटाला 'नाद करायचा नाय' फेम संगीतकार दिनकर शिर्के यांचे संगीत लाभले असून 'या बया दाजी आलं' हे बहारदार गीत त्यांनीच लिहिले आहे.



'या बया दाजी आलं' या गाण्याबद्दल बोलताना गीत, संगीतकार दिनकर शिर्के म्हणाले, 'या बया दाजी आलं' ही लावणी मला एका प्रवासादरम्यान सुचली, एका टमटमच्या मागे हे वाक्य लिहिलेलं होतं, एका छोट्या मुलीने ते वाचलं आणि सारखं गुणगुणतं होती त्यातून ही लावणी घडली. उर्मिला धनगर यांनी आपल्या खास शैलीत स्वरबद्ध केली असून, नृत्य दिग्दर्शक धैर्यशील उत्तेकर आणि एक्सप्रेशन क्वीन माधुरी पवारने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. चित्रपटात आणखी चार गाणी असून, प्रत्येकाचा बाज वेगळ्या धाटणीचा असल्याने 'इर्सल' ची गाणी प्रेक्षकांना भावतील, असा विश्वास आहे. 


दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार म्हणाले की, आतापर्यंत राजकारणावर अनेक चित्रपट, नाटकं आली आहेत. बर्‍याचदा त्यातील मांडणी खूप वरच्या स्तरातील असते. ‘इर्सल’ हा हा चित्रपट एकदम खालच्या फळीतील राजकारण आणि त्यातून प्रत्यक्ष घडणार्‍या घटनांमागील घटनांचा पर्दाफाश करतो. प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार जाणूनबुजून किंवा अप्रत्यक्ष या षडयंत्रात कसा गोवला जातो? ते इर्सलच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवणे, हेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे.


'इर्सल'चे निर्माते विनायक आनंदराव माने आहेत, तर विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही फ्रेश जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुजाता मोगल, शरद जाधव,  संजय मोहिते, सुधीर फडतरे यांच्यासह इतर कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'इर्सल' चित्रपटाची कथा अनिकेत बोंद्रे यांची असून, पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची आहे. संवाद विश्वास सुतार यांचे आहेत. 'इर्सल'चे छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे.  बहुचर्चित 'इर्सल' येत्या 3 जून 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :


Khatija Rahman : खतीजा रहमानचा निकाह संपन्न! ए.आर.रहमानने लेकीला शुभेच्छा देत शेअर केली खास पोस्ट..


Doctor Strange Twitter Review :  ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ प्रेक्षकांच्या भेटीला, नेटकऱ्यांना कसा वाटला चित्रपट? जाणून घ्या...


KGF 2 Breaks Record: ‘केजीएफ 2’ची बॉक्स ऑफिसवर हवा! ‘RRR’ला मागे टाकत ‘रॉकी भाई’चा नवा रेकॉर्ड!