Loksabha Election 2024 Celebrity List : नुकतीच भाजपच्या (BJP) केंद्रीय निवडणूक समितीकडून लोकसभा 2024 (Loksabha Election 2024) च्या निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काही कलाकार मंडळींची देखील वर्णी लागलीये. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सेलिब्रिटी देखील मैदानात उतरलेत. मागील अनेक दिवसांपासून भाजपच्या उमेदवारांची चर्चा होतीच पण यामध्ये अनेक सेलिब्रिटींना संधी मिळणार असल्याचं सांगितलं जातं होतं. 


अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini), स्मृती इराणी (Smriti Irani) तसेच अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) आणि मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांची नावं या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195   उमेदवारांचा समावेश आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. 


'या' मतदारसंघातून दिलं तिकीट


अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणार आहेत. स्मृती इराणी या अमेठी या मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवणार आहेत. तसेच गोरखपूरमधून रवी किशन यांना तिकीट देण्यात आलंय. अभिनेते मनोज तिवारी यांना  उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. 


'या' सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा


मागील काही दिवसांपासून भाजपकडून निवडणुकांच्या रिंगणात सेलिब्रिटींना उतरवण्याची चर्चा सुरु होती. त्यामध्ये अक्षय कुमार कंगणा रानौत यांची देखील नावं होती. अक्षय कुमारला  चंदिगड किंवा दिल्लीतील एखाद्या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल, असं सांगण्यात येत होतं. तसेच कंगना रानौतला उत्तराखंडमधून निवडणुकीचं तिकीट मिळणार असल्याचं सांगण्यात येत होतं. पण अद्याप या नावांवर कोणत्याही प्रकारचं शिक्कामोर्तब झालेलं नाही. तसेच पहिल्या यादीत देखील ही नावं नाहीत. त्यामुळे या सेलिब्रिटींची देखील वर्णी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांना दक्षिण भारतामधील एखाद्या मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट दिले जाईल, अशी माहिती समोर आली होती. 


भाजपकडून कोणत्या राज्यात किती उमेदवार?


भाजपकडून पहिल्या यादीत उत्तर प्रदेश 51, पश्चिम बंगाल 26, मध्यप्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12, तेलंगना 9, आसाम 14, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू-काश्मीरमधील दोन, उत्तराखंडमधील तीन, अरुणाचल प्रदेशातील दोन, गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकी एका उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलीये. 


ही बातमी वाचा : 


Loksabha Election 2024: मोठी बातमी: क्रिकेटपटू युवराज सिंह, अक्षय कुमार भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात? 'या' मतदारसंघातून उमेदवारी