मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर सतत आपल्या ट्विटरवर सक्रिय असतात. आपल्या आठवणी तसेच कुणाच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी त्या नेहमी या प्लॅटफॉर्मचा वापर करत असतात. आज त्यांनी आपल्या रेडिओवर पहिल्या गाण्याच्या संदर्भातील आठवणीबाबत एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये लता मंगेशकर म्हणतात की,  आजपासून बरोबर 79 वर्षापूर्वी 16 डिसेंबर 1941 रोजी मी रेडिओवर पहिल्यांदा गाणं गायलं होतं. मी 2 नाट्यगीतं गायिली होती. ज्यावेळी माझ्या वडिलांनी ही गाणी ऐकली त्यावेळी ते खूप खूश झाले. त्यांनी माझ्या आईला सांगितलं की, आज मी लताला रेडिओवर ऐकलं, मला फार आनंद झाला. आता मला काहीही चिंता नाही, असं लता मंगेशकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.





मला कळलं होतं माझ्यावर विषप्रयोग कुणी केला, पण पुरावा नव्हता : लता मंगेशकर


नुकतंच लता मंगेशकर यांनी बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना फार पूर्वी विषबाधा झाली होती. ही बाब सांगतानाच, काही अफवांनाही त्यांनी फेटाळून लावलं होतं. हे साल होतं 1963 चं. तेव्हा लता मंगेशकर हे नाव संपूर्ण भारताला माहित झालं होतं. त्यांच्या आवाजाची जादू सर्वदूर पसरली होती. लतादीदींना गाण्यासाठी दिवसाचे तास कमी पडत होते. आणि नेमकं हे घडत असताना तो दिवस उगवला. याबद्दल बोलताना लतादिदी म्हणाल्या होत्या की, 'ही खूप जुनी गोष्ट आहे. आम्ही कोणीही मंगेशकर कुटुंबीय त्या दिवसांबद्दल फार बोलत नाही. पण त्यावेळी मला विषबाधा झाली होती. त्यावेळी मी झोपून होते. मला भयंकर अशक्तपणा आला होता. हा प्रकार इतका भयावह होता की मला उठून चालताही यायचं नाही. मी भविष्यात चालेन की नाही असाच प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता.' लता मंगेशकर यांची तब्येत खालावली होती. साहजिकच गाणं बंद होतं. त्यामुळे त्यावेळी अनेक तर्कवितर्कांना ऊत आला होता. त्यातलीच त्यावेळची एक चर्चा होती ती, लता मंगेशकर कदाचित यापुढे कधीच गाऊ शकणार नाहीत ही. पण लता दिदींनी ती अफवा असल्याचं सांगत हा मुद्दा फेटाळून लावला. त्या म्हणतात, 'मला अशक्तपणा आला होता हे खरं आहे. पण मी गाऊच शकणार नाही असं मला कुणीही सांगितलं नव्हतं. तशी शक्यताही नव्हती. त्यावेळी आमचे फॅमिली डॉक्टर होते आर.पी. कपूर. त्यांनी माझी खूपच काळजी घेतली. उलट मी कधी एकदा स्वत:च्या पायावर उभी राहतेय असं त्यांना झालं होतं. खरंतर त्यांचे आभार आहेत.' हा विषप्रयोग झाल्यानंतर पुढचे तीन दिवस लता मंगेशकर पूर्णत: बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यानंतर हळूहळू त्या यातून सावरल्या.


लता मंगेशकर यांनी त्यानंतर काही काळ आराम केला. त्यांना गायचं तर होतं. पण रेकॉर्डिंग करावं की नाही असा विषय होता. त्यावेळी त्यांच्या घरी आले ते गायक-संगीतकार हेमंतकुमार. त्यांच्या एका चित्रपटासाठी लतादिदींनी गावं असा त्यांचा आग्रह होता. ही आठवणही लतादिदी सांगतात. 'त्यावेळी हेमंत कुमार आमच्या घरी आले. त्यांना एका गाण्याचं रेकॉर्डिंग करायचं होतं. पण मी गावं की नाही असा संभ्रम होता. हेमंतदा माझ्या आईला भेटले. आईने परवानगी दिली पण एका अटीवर. मी गाताना मला आवाजाला जराही ताण येतोय वा कोणताही त्रास होतोय असं जाणवलं तर मला तडक घरी सोडलं जाईल अशी ग्वाहीच हेमंत कुमार यांनी दिली. त्यानंतर मी रेकॉर्डिंगला गेले. या आजारातून उठल्यावर मी पहिलं गाणं गायले ते 'कही दीप जले कही दिल' हे 'बीस साल बाद'मधलं गाणं. त्यानंतर मात्र मला फार त्रास झाला नाही.'


त्यावेळी झालेल्या उपचारात लता दिदींना विषबाधा झालीय हे निष्पन्न झालं होतं. यातल्या उपचारासाठी लतादिदी थोडे थोडके नव्हे तर तब्बल तीन महिने गादीला खिळून होत्या. पण त्यातून बाहेर यायची त्यांची जिद्द आणि योग्य वैद्यकीय उपचारांनी ते शक्य करुन दाखवलं.