Lata Mangeshkar Health Update : कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर, गेल्या 18 दिवसांपासून दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती आता स्थिर होत आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत, परंतु डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले गेले आहे.



लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतीत समदानी यांनी एबीपीशी संवाद साधताना सांगितले होते की, लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनिया देखील झाला आहे, ज्याला कोविड न्यूमोनिया असेही म्हणतात. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या लता मंगेशकर आयसीयूमध्येच दाखल असून पाच डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.



मंगेशकर कुटुंबीयांचे निवेदन


लता दीदींच्या तब्येतीत अंशत: सुधारणा झाली असून त्यांच्यावर डॉ. प्रतीत समदानी यांच्यासह 5 डॉक्टरांचे पथक उपचार करत आहेत. त्या अद्याप आयसीयूमध्येच आहेत. लता दीदींच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती देणं शक्य नाही. कृपया, प्रकृतीबाबत कोणत्याही त्रासदायक अफवा पसरवू नका.


92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात 'प्रभू कुंज' येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले आहेत. उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉ. प्रतीत समदानी यांनी एबीपी न्यूजला सांगितले होते की, लता दीदींना कोरोनासोबतच न्यूमोनिया देखील झाला आहे, ज्याला 'कोविड न्यूमोनिया' असेही म्हणतात.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha