Lata Mangeshkar Death News: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. 


लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला होता. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते. लता मंगेशकर अर्थात लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर 'गानकोकिळा' अशी बिरुदावली आपल्या नावासमोर मिळवली.


लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942  मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून राहिली. त्यांनी हजारहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली. तर अनेक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये देखील गायन केले. 2001 साली त्यांना 'भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला.


मंगेशकर कुटुंबाचा संगीताचा वारसा


लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर शहरात झाला होता. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता दीदी या आपल्या बांधवांमध्ये सर्वात मोठ्या. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लता दिदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली होती. 1942 मध्ये लता दिदी अवघ्या 13 वर्षांच्या असताना त्यांचे वडील हृदयविकाराच्या झटक्याने वारले होते. त्यानंतर लता मंगेशकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले.


लता मंगेशकर यांचं ब्रीच कॅंडी रुग्णालयात सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झालं. दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत प्रभूकुंज इथं अंतिम दर्शनासाठी लतादीदींचं पार्थिव ठेवलं जाणार आहे. सायंकाळी साडेसहा शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या अंतिम संस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान 4 वाजता मुंबईत दाखल होणार आहेत. लदादीदींचं पार्थिव विशेष लष्करी वाहनातून शिवाजी पार्क येथे आणलं जाणार आहे. 


संबंधित इतर बातम्या


 Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!


Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट


Lata Mangeshkar Death : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 


Remembering Lata Mangeshkar LIVE: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड