South Psychological Thriller Movie: आधी थिएटरमध्ये किंवा एखाद्या चॅनलवरुन प्रसारित झाल्यानंतरच चित्रपट पाहणं शक्य व्हायचं. पण, आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही कधीही आणि कुठेही चित्रपट पाहू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका धमाकेदार चित्रपटाबाबत सांगणार आहोत. हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट पाहून तुम्ही नक्कीच चक्रावून जाल. डोक्यातला गोंधळ तुम्हाला नक्की भंडावून सोडेल.
'कुट्टरामे थंडानाई' (Kuttrame Thandanai) असं या चित्रपटाचं नाव आहे. ज्याचा अर्थ 'गुन्हा ही एक शिक्षा आहे', असा होता. जर तुम्हाला साऊथचे चित्रपट पाहण्याची आवड असेल तर, हा चित्रपट तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. याशिवाय, जर तुम्हाला सायकॉलॉजिकल थ्रिलर फिल्म्स पाहण्याची आवड असेल, तर तुम्हाला हा चित्रपट नक्कीच आवडेल.
'कुट्टरामे थंडानाई' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, हा तमिळ भाषेतील चित्रपट आहे, जो 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तुम्हाला साऊथचा एकही सुपरस्टार दिसणार नाही, किंवा कोणतीही बोल्ड अभिनेत्री दिसणार नाही. हा चित्रपट कोणत्या सेलिब्रिटी आणि ग्लॅमरस अॅक्टर्सशिवाय कथानकाच्या जोरावर खिळवून ठेवतो. ही एक अत्यंत साधी कथा आहे, पण या कथेतील ट्विस्ट असा आहे की, ज्याचा तुम्ही चुकूनही विचार करू शकणार नाही.
'कुट्टरामे थंडानाई'च्या कास्टबाबत बोलायचं तर, चित्रपटात विधार्थ, पूजा देवरिया आणि ऐश्वर्या राजेश हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. जी मारीमुथी, योगी बाबू, रहमान नासर यांच्यासह अनेक स्टार्सही सहाय्यक भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन एम मणिकंदन यांनी केलं आहे. हा चित्रपट 'क्राईम अँड पनिशमेंट' या कादंबरीवर आधारित आहे. IMDb रेटिंगबद्दल बोलायचं झालं तर त्याला 7.6 रेटिंग मिळालं आहे.
चित्रपटाबाबत थोडसं...
'कुट्टरामे थंडानाई'च्या कथेबद्दल बोलायचं झालं तर, सुरुवातीला काही मिनिटांसाठी कथा खूपच संथ वाटू शकते. अगदी सामान्य जीवनापासून सुरुवात होते. पण हळूहळू कथा उलगडू लागते. ही कथा एका व्यक्तीभोवती फिरते, जी हळूहळू आपली दृष्टी गमावतेय. त्या व्यक्तीला दुर्मिळ आजार आहे. त्यामुळे तो हळूहळू आंधत्वाकडे वाटचाल करत असतो.
डॉक्टरांनी त्या व्यक्तीला सांगितलंय की, शस्त्रक्रिया हाच त्याचे डोळे वाचवण्याचा एकमेव पर्याय आहे. पण नेत्र प्रत्यारोपणासाठी मोठी रक्कम लागते. एक सामान्य नोकरी करणारा माणूस लाखो रुपये कुठून आणणार? इथूनच पुन्हा कथेला नवं वळण मिळतं. पैशासाठी तो व्यक्ती काहीशा विचित्र परिस्थितीतही अडकतो. तो एका खुनाच्या प्रकरणात अडकतो. यामागील रहस्य जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.
दरम्यान, 2 सप्टेंबर 2016 रोजी 'कुट्टरामे थंडानाई' रिलीज झाला होता. हा 1 तास 33 मिनिटांचा लघुपट आहे, ज्याला त्यावेळी खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. तुम्हालाही ही कथा आवडली असेल आणि ती पाहायची असेल, तर तुम्ही ती YouTube वर पाहू शकता. हा चित्रपट हिंदीतही उपलब्ध आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :