Kumar Shahani Passed Away: चित्रपट निर्माते कुमार साहनी (Kumar Shahani) यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. साहनी यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री मीता वशिष्ठ यांनी सांगितले की, काल रात्री कोलकाता येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'वार वार वारी', 'ख्याल गाथा' आणि 'कस्बा' या चित्रपटात मीता विशिष्ठ यांनी साहनी यांच्यासोबत काम केले आहे.
साहनी हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्याचप्रमाणे त्यांची प्रकृती देखील खालावत चालली होती. शनिवार 24 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. दरम्यान हे खूप मोठे वयक्तिक नुकसान असल्याची प्रतिक्रिया मीता वशिष्ठ यांनी दिली.'आम्ही त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात होतो. कुमार आणि मी खूप बोलायचो आणि मला माहित होतं की तो आजारी आहे, पण हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे.
कुमार साहनी यांचे चित्रपट
भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठे दिग्दर्शक म्हणून साहनी यांची ओळख होती. यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. कुमार साहनी यांनी 'माया दर्पण', 'चार अध्याय' आणि 'कस्बा' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. कुमार साहनी यांचा जन्म 1940 मध्ये फाळणीपूर्वी भारतातील सिंधमधील लारकाना येथे झाला. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर साहनी यांचे कुटुंब मुंबईत आले. साहनी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठे व्यक्तिमत्त्व मणि कौल यांच्यासोबत साहनी यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे येथे शिक्षण घेतले होते.
कुमार साहनी यांच्या चित्रपटाला मिळालेत राष्ट्रीय पुरस्कार
हिंदी लेखक निर्मल वर्मा यांच्या लघुकथेवर आधारित 'माया दर्पण' या चित्रपटाद्वारे साहनी यांनी 1972 साली सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यांच्या या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.