Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) समर्थनार्थ कलाकार तसेच राजकीय क्षेत्रातील अनेकांनी भाष्य केलं आहे. नुकतच ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी देखील पोस्ट करत घडलेल्या प्रकारावर निषेध व्यक्त केला आहे. पण यावेळी त्यांनी एक खोचक टोला देखील लगावला आहे. अनेक घटनांचा दाखला देत तेव्हा मूग गिळून गप्प बसणाऱ्यांना आता 'समस्त महिलावर्गाविषयी' पुळका वगैरे कसा आला असा प्रश्न उपस्थित केला आहे.
आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकारण बरंच तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख केला. त्याचवेळी त्यांनी काही अभिनेत्रींचीही नावं घेतलीत.त्यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं. प्राजक्ताचं नाव घेतल्यानंतर अभिनेत्री त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत महिला आयोगात तक्रार केली. तसेच सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणीही प्राजक्ताने या माध्यमातून केली आहे. सोशल मीडियावरही प्राजक्ताच्या समर्थनार्थ अनेक कलाकारांनी पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं. किरण माने यांनीही प्राजक्ताच्या वक्तव्याचा निषेध केलाय. पण त्यांनी खोचक असा टोलाही लगावला आहे.
किरण माने यांची पोस्ट नेमकी काय?
किरण माने यांनी पोस्ट करत म्हटलं की, प्राजक्ताबाबतचे विधान निंदनियच आहे...त्याचा निषेध. पण सोनियाजींचे बिकीनीवरचे फोटोज व्हायरल झाले होते... कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होत्या... मणिपूरला भगिनींची विटंबना झाली... तेव्हा जे महाभाग मुग गिळून वगैरे गप्प बसले, त्यांना अचानकभयानक 'समस्त महिलावर्गाविषयी' पुळका वगैरे यावा हे फार विनोदी वगैरे आहे !#सुमारांचा_थयथयाट
प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले. माझ्याविरोधात युट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.