Deepali Sayed On Prajakta Mali Case: परभणीतील (Parbhani) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ पसरली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. हे प्रकरण नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनातही गाजलं. अशातच काही दिवसांपूर्वी भाजप आमदारानं केलेल्या वक्तव्यानं या प्रकरणाची संपूर्ण दिशाच बदलली आहे. भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी थेट एका मराठी अभिनेत्रीचा संबंध जोडला आणि पुन्हा एकदा खळबळ माजली. 

Continues below advertisement


भाजप आमदार सुरेश धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं (Prajakta Mali) नाव थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडलं. यामुळे मराठी कलाविश्वातून संताप व्यक्त केला जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्यानं आणि त्यापाठोपाठ मंत्री मुंडे यांच्यासोबत मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव जोडलं गेल्यानं आता चर्चांना उधाण आलं आहे. याप्रकरणी प्राजक्ता माळीसाठी अनेक मराठी कलाकार पुढे आले आहेत. अशातच, प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी आता सुरेश धस यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. 


शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, "संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या न्यायासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशी आशा जागा झाली. काल मी प्राजक्ताची पूर्ण पत्रकार परिषद पाहिली. प्राजक्ताला रडताना पाहिलं तेव्हा वाईट वाटलं. कारण तिने रडलं नव्हतं पाहिजे." 


पुढे बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या की, "प्राजक्ता महाराष्ट्राची आवडती कलाकार आहे. तुला तुझं मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. करुणा धनंजय मुंडेनं जेव्हा तिचं नाव घेतलेलं, तेव्हाच तिनं तिचं मत मांडायला हवं होतं. तिला ठासून विचारायला पाहिजे होतं की, मी काय असं केलंय की, तुम्ही माझं नाव घेताय? करुणा मुंडे ही धनंजय मुंडे यांची पत्नी आहे. याप्ररकरणात सुरेश धस चुकीचे आहेत. सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्यासाठी लढा उभारला. पण आता कलाकारांची नावं घेणं चुकीचं आहे. याचा अर्थ तुम्ही सर्व कलाकारांना एकत्र आणलं. त्यांनी प्राजक्ताची नव्हे तर सर्व कलाकारांची माफी मागितली पाहिजे."


"कलाकारांच्या नावामागे ग्लॅमर आहे, त्यामुळे तुम्ही त्यांची नावं घेता. कारण त्यांचं नाव घेतलं की ते माध्यमातही येतं. राजकीय नेतेच कला-क्रीडा महोत्सव करतात. मोठ मोठ्या कलाकारांना बोलावलं जातं. याचा अर्थ तुम्ही बोलताय हे सर्व कलाकार असेच आहेत का? अशा पद्धतीनं कलाकारांचं नाव का घेता? नाहीतर तुम्ही पुरावा द्या.", असं आवाहनही दिपाली सय्यद यांनी केलं आहे.