Nilu Phule : मराठी कलाकारासांठी आणि रसिक प्रेक्षकांसाठी निळू फुले (Nilu Phule) हे नाव कायमच खास राहिलं आहे. मराठी सिनेमा, नाटकं यामध्ये विविधांगी भूमिका अगदी सहज पेलण्याचं आव्हान ते लिलया पार पाडायचे. म्हणूनच मराठी सिनेमामधल्या या खलनायकासाठी थिएटर्स अगदी हाऊसफुल्ल व्हायचे. पत्रकार,लोककलावंत अशा अनेक व्यक्तिरेखा निळूभाऊंनी अगदी अजरामर केल्या आहेत. त्यामुळे मराठी कलाकारांसाठी निळू फुले हे नाव कायमच खास ठरतं. 13 जुलै रोजी त्यांना जाऊन 15 वर्ष होत आहेत. त्याचनिमित्ताने अभिनेते किरण माने यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
किरण माने यांनी निळू फुलेंसोबतचा एक फोटो देखील शेअर केलाय. त्याचप्रमाणे त्यांनी या फोटोमागचा किस्सा देखील सांगितला आहे. नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला.
किरण माने यांची पोस्ट नेमकी काय?
'1980 नंतरचा काळ...मायणीमधलं 'गरवारे टूरींग टाॅकीज', तंबू थेटरमध्ये 'शनिमा' बघताना घाबरुन आईला चिकटून बसलेला मी ! कारण डद्यावर 'कर्रकर्रकर्र' असा कोल्हापुरी चपलांचा आवाज करत 'त्यानं' एन्ट्री घेतलेली असायची.बेरकी भेदक नजर - चालन्याबोलन्यात निव्वळ 'माज' - नीच हसनं, शेजारी बसलेल्या माझ्या गावांतल्या अडानी आया-बहिनी रागानं धुसफूसायला लागायच्या. सगळीकडनं आवाज यायचा : "आला बया निळू फुल्या..! मुडदा बशिवला त्येचा. आता काय खरं न्हाय." थिएटरमधल्या शांततेला चिरत त्यो नादखुळा आवाज घुमायचा "बाई,आवो आपला सोत्ताचा यवडा वाडा आस्ताना तुमी त्या पडक्यात र्हानार? ह्यॅS नाय नाय नाय नाय बाईSS तुमाला तितं बगून आमाला हिकडं रातीला झोप न्हाय यायची वोS" आग्ग्गाय्य्यायाया...अख्ख्या पब्लीकमध्ये तिरस्काराची एक लाट पसरायची...'
'जीवाचा कान' करून त्यांना ऐकायचो - किरण माने
'1990 नंतरचा काळ... कॉलेजला मायणीवरनं सातारला आलेलो मी.अभिनयाकडं जरा सिरीयसली बघायला सुरूवात झालेली.जुन्या क्लासिक मराठी-हिंदी-इंग्रजी फिल्मस् पाहून 'अभिनयवेड्या' मित्रांशी तासन्तास चर्चा - 'अभ्यास'.अशात एक दिवस 'सिंहासन' बघितला ! त्यात निळूभाऊंनी साकारलेला पत्रकार दिगू टिपणीस पाहून येडा झालो ! 'सामना' मधला हिंदूराव पाटील,'पिंजरा' मधला परिस्थितीनं लोचट-लाचार बनवलेला तमासगीर, 'एक होता विदूषक' मधला सोंगाड्याच्या भूमिकेचं मर्म सांगणारा लोककलावंत,आईशप्पथ ! केवढी अफाट रेंज ! भारावलो.'सखाराम बाईंडर' नाटक वाचल्यानंतर भाऊंनी सखाराम कसा साकारला असेल ते 'इमॅजीन' करायचो कायम.पुढं ते जेव्हा कधी भेटले, तेव्हा मी मुद्दाम 'बाईंडर'चा विषय काढायचो आणि 'जीवाचा कान' करून त्यांना ऐकायचो.'
'महान' अभिनेत्यानं 'जगणं' शिकवलं - किरण माने
'दूबेजींचं वर्कशॉप केल्यानंतर निळूभाऊंच्या नाट्यसंस्थेनं निर्मिती केलेल्या एका कवितावाचनाच्या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं गेलं. त्या निमित्तानं निळूभाऊंना जवळून पहाण्याचा योग आला. त्यानंतर बर्याच वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने गाठीभेटी,चर्चा होत राहिल्या.निळूभाऊ सातारच्या माझ्या घरीही आले. तास-दोन तास दिलखुलास गप्पा मारल्या. विनम्रता एवढी की, समोरच्या माणसाला संकोच वाटावा ! जो काही छोटासा सहवास लाभला त्यात या 'महान' अभिनेत्यानं 'जगणं' शिकवलं.कलाकाराला 'भवतालाचं भान' कसं असावं याचा आदर्श याची देही याची डोळा पाहिला. भाऊ, तुम्हाला जाऊन पंधरा वर्ष झाली ! पुणे-सातारा हायवेवर वेळेजवळ आजही तुमचा फोटो असलेलं होर्डींग झळकत असतं. त्यावर लिहीलंय :'मोठा माणूस'!'
निळू फुले यांची कारकिर्द
निळू फुले यांनी 'कथा अकलेच्या कांद्याची' या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केले. 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सलग 40 वर्षे या चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी 12 हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास 140 चित्रपटांमधून काम केले. 'सामना' चित्रपटातील हिंदूराव पाटील, सिंहासन चित्रपटातील पत्रकार दिगू टिपणीस, सखाराम बाईंडर या नाटकातील सखाराम बाईंडर या त्यांनी साकारलेल्या भूमिका अजरामर ठरल्या. निळू फुले यांनी साकारलेल्या विनोदी व्यक्तिरेखाही लोकांच्या पसंतीस उतरल्या.
ही बातमी वाचा :