67th National Film Awards केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नुकतीच 67 व्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली. यामध्ये अभिनेत्री कंगना रनौत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून घोषित करण्यात आलं. 'मणिकर्णिका' आणि 'पंगा' या दोन चित्रपटांसाठी कंगनाला या पुरस्कारानं गौरवण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. 


कंगनाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच तिच्या नावे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे, ही बाब तिचा यंदाचा वाढदिवस आणखी खास करुन जाणार यात शंका नाही. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कंगनाला पसंती मिळालेली असतानाच सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मनोज बाजपेयी आणि धनुष या दोन्ही कलाकारंना विभागून देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या 'छिछोरे' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवडण्यात आलं. 






National Film Awards 2021 | 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर 


कंगनाचं मोठं यश


कलाविश्वात एक अभिनेत्री म्हणून कंगनाच्या नावे जाहीर करण्यात आलेला हा पुरस्कार म्हणजे तिच्या वाट्याला आलेलं मोठं यश ठरत आहे. शबाना आझमी यांच्यानंतर कंगना ही एकमेव अशी अभिनेत्री आहे जिनं चौथ्यांदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपली छाप सोडली आहे. कंगनाला आतापर्यंत 'क्वीन', 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या चित्रपटांसोबतच 'फॅशन' या चित्रपटासाठीही राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.


दरम्यान, 2019 या वर्षात प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटांना या पुरस्कार सोहळ्यात विविध प्रवर्गांमध्ये विभागत गौरवान्वित करण्यात येणार आहे. मागील वर्षी मे महिन्यामध्येच हा पुरस्कार सोहळा पार पडणं अपेक्षित होतं. पण, कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्यामुळं तसं होऊ शकलं नाही.