रत्नागिरी : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या, सचिन वाझे यांचा सहभाग आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकलेला 'लेटर बॉम्ब' यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधक अर्थात भाजपकडून महाविकास आघाडी सरकार, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना लक्ष्य करत त्यांच्या राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. अगदी केंद्रीय तपास यंत्रणा देखील यामध्ये तपास करत आहेत. या साऱ्या प्रकरणावर आता माजी मंत्री आणि शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया आली आहे. 


"महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही. हीच भाजपच्या मनात सल आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात आहे. शिवाय, राज्यात भाजपचं सरकार आलं नाही तर 2024 मध्ये केंद्रात भाजप सरकार नसेल याची देखील भाजपला कल्पना आहे. हिच भाजपची दुखरी नस असून याच कारणास्तव भाजपकडून वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात असल्याची टीका भास्कर जाधव यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. भाजप बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरून मोठी झाली झाली असून त्यांनीही ही बाब आता ध्यानात ठेवावी. पण, त्यांनी आता त्याच वेलीला संपवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे." अशी आठवण देखील यावेळी त्यांनी करून दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर टीका करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 


राणेंना जाधवांचं उत्तर


नारायण राणे यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत थेट मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. उद्धव ठाकरे हे सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. वाझेंनी वर्षावर वास्तव्य केलं होतं. या साऱ्या प्रकरणात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी राणेंनी केली होती. यावर विचारले असता जाधव यांनी राणेंवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. 'काही लोकांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहिली होती. मुख्यमंत्री होता न आल्यानं त्यांनी टाहो देखील फोडला होता. पण, त्यानंतर देखील ते मुख्यमंत्री झाले नाहीत. सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत हे अनेकांच्या पचनी पडत नसल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आम्हीही देत नाही आणि तुम्ही देखील देऊ नका, असं उत्तर भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्या रविवारच्या टीकेला दिलं आहे. 


'...मग त्यावेळी अमित शहांनी राजीनामा का नाही दिला?'


परमबीर सिंह यांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. त्याला देखील भास्कर जाधव यांनी उत्तर दिलं आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर वंजारा या पोलीस अधिकाऱ्यानं यापेक्षा देखील गंभीर आरोप केले होते. मग, त्यावेळी अमित शहा यांनी राजीनामा का नाही दिला? कोर्टाच्या आदेशानंतर तर अमित शहा हे 2 ते 3 वर्षे राज्याबाहेर होते. त्यामुळे भाजपनं नैतिकता शिकवू नये असं उत्तर यावेळी जाधव यांनी विरोधकांच्या मागणीला दिलं आहे. शिवाय, परमीबीर सिंह यांच्या पत्रावर सही नाही, त्यांचा मेल आयडी देखील संशयास्पद आहे. तसेच देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आल्यानंतरच हे पत्र का समोर आलं? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थिती केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :